Amit Shah On Maharashtra Politics Talks Shivsena And NCP: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नेमकी कशामुळे फूट पडली यासंदर्भात शाह यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंचा संदर्भ देत प्रतिक्रिया नोंदवली आहे. अमित शाहांनी भाजपाने या पक्षांमध्ये फूट पाडलेली नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
अमित शाहांनी 'इंडिया टु डे कॉनक्लेव्ह'च्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये शाह यांना महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "महाराष्ट्रात तुम्ही अनेक पक्षांमध्ये फूट पाडली. त्यांना तुमच्या जवळ आणलं स्वत:ला तिथं मजबूत केलं. मात्र तेथील स्थानिक जाणकारांचा असा अंदाज आहे ही शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो. तुम्हाला किती विश्वास आहे की सध्याची तेथील युती किती चांगली कामगिरी करेल?" असा प्रश्न पत्रकार राहुल कनवाल यांनी विचारला.
भाजपाने महाराष्ट्रातील पक्षांमध्ये फूट पाडल्याचं वाक्य ऐकताच अमित शाहांनी आपण या वाक्याशी सहमत नसल्याचं म्हटलं. "आम्ही अनेक पक्षांमध्ये फूट पाडली या तुमच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. अनेक पक्षांमध्ये पुत्र आणि मुलीवर असलेल्या प्रेमामुळे फूट पडली आहे," असं अमित शाह म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. पुढे बोलताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाचा म्हणजेच आमदार आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला. "उद्धव ठाकरेंना वाटत होत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनावेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील अनेक आमदार बाहेर पडले. हे आमदार आदित्य ठाकरेंना नेता म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. बाळासाहेबांच्या वेळेपासून काम करणाऱ्यांनी आधी उद्धव ठाकरेंना स्वीकारलं. आता आदित्य ठाकरेंना त्यांना स्वीकारावं लागत होतं. ते त्यांना मान्य नव्हतं," असा दावा शिवसेनेतील फूटीसंदर्भात बोलताना अमित शाहांनी केला.
नक्की वाचा >> 6 हजार कोटींच्या इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, '12 लाख कोटींचे..'
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीसंदर्भातही अमित शाहांनी प्रतिक्रिया नोंदवली. "शरद पवारांना आपल्या लेकीला नेता बनवायचं होतं. अनेकजण त्याच्याशी सहमत नव्हते म्हणून ते बाहेर पडले. आम्ही पक्षांमध्ये फूट पाडली असं तुम्ही म्हणू नका. पुत्र आणि लेकीच्या मोहाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पाडली, हे वास्तव आहे," असं अमित शाह म्हणाले.