Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे नाराज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एक-दोन दिवसांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून, ते शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे जाहीर केलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका देखील केली.
पक्ष फुटीनंतर दोघेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असले तरी उभयतांमध्ये विस्तव जात नाहीये. लोकसभेसाठी खैरे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी ते कामाला लागले आहेत. खैरेंच्या उमेदवारीस दानवे यांचा विरोध आहे. ते स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, राज्यात प्रचारासाठी तुमची गरज असल्याचे दानवे यांना मातोश्रीवरून सांगण्यात आले. खासदार संजय राऊत यांनीही दानवे यांची मनधरणी केल्याचे समजते. अशातच दानवे शुक्रवारी संध्याकाळच्या विमानाने मुंबईहून संभाजीनगरकडे निघाले होते. मात्र मातोश्रीहुन तातडीने बोलावणं आलं आणि ते मातोश्री वर गेले आणि तिथं चर्चा झाली असल्याचं कळतंय. त्यामुळे दानवे शनिवारी पहाटेच्या विमानांना संभाजी नगरात पोहोचले. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी सोमवारी एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. त्यावरुन अंबादास दानवे पक्षाला रामराम करणार असच्याची चर्चा होती. मात्र आपण नाराज नसल्याचे दानवेंनी स्पष्ट केलं.
"आम्ही त्यांच्या कर्तव्यांचे पालन करतो. आता बदनामी करणाऱ्या बातम्या येत आहे. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. एवढी मोठी जबाबदारी असताना मी इकडे तिकडे जाणे या सगळ्या गोष्टी हवेतल्या गप्पा आहेत. मी गेल्या 10 वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवली नाही. हे पक्षप्रमुखांनाही माहिती आहे. अजूनही कोणता चेहरा दिलेला नाही. निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. मी फक्त इच्छा व्यक्त केली आहे," असे अंबादास दानवे म्हणाले.
"कार्यालयाच्या भूमिपूजनाबाबत मला कल्पनाही नव्हती. प्रचाराचे असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी आहे आणि राज्याचा विरोधीपक्षनेता आहे. हे मी पक्षप्रमुखांच्या कानावर घातलं आहे. उमेदवारीसाठी आग्रह नसतो. पण काही भूमिका पक्षनेतृत्वाच्या कानी गेल्याच पाहिजे. एकच बाजू चालत असेल तर आणि एकांकीपणाने कोणी वागत असेल तर याची दखल पक्षाने घेतली पाहिजे. पण या गोष्टी बाहेर काही बोलण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
"चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात. पण मी चंद्रकांत खैरेकडे पाहून नाही तर उद्धव ठाकरेंकडे पाहून पक्षाचे काम करतो. त्यामुळे ते काम मानतात याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. उमेदवारीबाबत माझी मागणी नोंदवली आहे. मागच्या दोनवेळा इच्छा व्यक्त केली तरी मी निवडणूक प्रमुख होतो. तरी मला तिकीट नाही भेटलं. त्यामुळे पक्षाच्या विषयी माझ्या मनात काहीच संभ्रम होणार नाही. खैरेंचे नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्यांचे काम करणार," असे अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं.