नितीन पाटणकर, झी २४ तास, पुणे : पुण्यातील आंबेगाव दुर्घटनेतील एक अतिशय दुर्दैवी योगायोग पुढं आला आहे. पटेल या एकाच कुटुंबातील चार जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जेठा पटेल आणि त्यांची पत्नी परदसीन पटेल यांचा मृत्यू झाला आहे. तर या दोघांची मुलगी ममता पटेल आणि जावई राधेलाल पटेल यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जेठा आणि परदसीन पटेल यांना ममता ही एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे संपुर्ण पटेल कुटुंब संपलं आहे.
राधेलाल आणि ममता याचं फेब्रुवारी महिन्यातच लग्न झालं होतं. दुर्घटना झालेल्या साईटवर जेठा आणि परदसीन पटेल काम करायचे. जावई राधेलाल आकुर्डी इथे साईटवर कामाला होता. ममता आपल्या आई वडिलांकडे गेली होती. तिला आणण्यासाठी राधेलाल सोमवारीच आंबेगाव येथील साईटवर गेला होता. तो ममताला घेऊन संध्याकाळी परत जाणार होता. मात्र तो सासू-सासऱ्यांकडे मुक्कामाला थांबला... आणि काळानं या नवविवाहित दाम्पत्यावर घाला घातला.
पुण्यात आंबेगाव पोलीस स्टेशन परिसरात भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झालेत. मृतांमध्ये ४ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तसाच प्रकार मंगळवारी सकाळी घडला. घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्व मजूर छत्तीसगडचे रहिवासी असल्याचं समजतंय. या घटनेत चार जण किरकोळ जखमी होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलय. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळाची पाहणी केली.