'सावरकरांचा खोटा पुळका का? तुमची धुणीभांडी करण्यासाठी...', अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका!

Ambadas danve On Chandrashekhar Bawankule : तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती, असं म्हणत अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र चालवलंय.

सौरभ तळेकर | Updated: Mar 17, 2024, 04:34 PM IST
'सावरकरांचा खोटा पुळका का? तुमची धुणीभांडी करण्यासाठी...', अंबादास दानवेंची भाजपवर घणाघाती टीका! title=
Ambadas danve critically reply Chandrashekhar Bawankule

Rahul Gandhi In Shivaji Park : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाहीर सभा होणार आहे. या सभेला देशातील दिग्गज नेत उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष आज शिवाजी पार्कवर लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित असतील. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान राहुल गांधींची पदयात्रा झाली. त्यानंतर आता राहूल गांधी यांच्या सभेवर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता राहुल गांधीच्या वावटळामुळे भाजप अस्वस्थ झाल्याचं चित्र दिसतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर निशाणा लगावला होता. त्यावर आता अंबादास दावने यांनी जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

2024 साली विजयाच्या धुंदीत एका फोनवर तुम्ही युती तोडली, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख देहाने भूतलावर नव्हते. हे तुम्ही भाग्य समजा. याउपर जाऊन राष्ट्रवादीचा आवाजी मतदानाने पाठिंबा घेऊन आपण 2014 साली सरकार स्थापन केले होते, हे लोकांना लक्षात आहे. तेव्हा मोठे साहेब असते तर ज्या भाषेत तुमच्यावर प्रहार झाला असता, तो तुम्हाला सहन झाला नसता. उगाच त्यांचे दाखले कशाला देता, असा टोला अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. 

बाळासाहेबांनी हयातभर भाजपच्या दावणीला पक्ष बांधण्यासाठी, तुमच्या पालख्या वाहण्यासाठी, तुमची धुणीभांडी करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केलेली नव्हती. ही देखील त्यांचीच शिकवण आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खोटा पुळका आहे तुम्हाला, जर हे प्रेम खरे असते तर एव्हाना तुम्ही त्यांना भारतरत्न देऊन मोकळे झाले असता, अशी घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. तत्पूर्वी या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाही. ते का करत नाही?, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? असा बोचरा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे, असं चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटलं होतं. आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? असा सवाल बानवकुळे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत बावनकुळे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.