Amaravati School Students: देशाच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक गावे आहेत जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतोय. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य असल्याचे आपण म्हणतो. अशावेळी त्यांना शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर जावं लागणं, त्यातही रस्ता चांगला नसल्याने गावात बस न येणं आणि पर्यायाने धोकादायक वाहनांचा प्रवास करावा लागणं हे अतिशय वेदनादायी आहे.
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत सल्याचे धक्कादायक वास्तव तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावात समोर आले आहे. स्वातंत्र्याची 77 वर्ष लोटली तरीदेखील नमस्कारी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.
नमस्कारी गावात एसटी बस जात नसल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून विद्यार्थी प्रवास करताय. छोटे रस्ते असल्याने पावसाळ्यात तर हा प्रवास अतिशय धोकादायक होतो. कधी अथांग भरलेल्या वर्धानदी पात्रातून नावेने तर कधी ट्रॅक्टरने जात हे विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा सवाल यानिमित्ताने गावकरी विचारत आहे. त्यामुळे आतातरी महामंडळ या विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.