IAS Puja Khedkar Controversy: ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय दिवसेंदिवस आणखीच खोलात जाताना दिसतो. आधी आपल्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने तसेच 'महाराष्ट्र शासन' लिहिल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली. दरम्यान त्यांचा ओबीसी प्रमाणपत्र वाददेखील समोर आलाय. दिवसेंदिवस समोर येत असलेल्या अनेक प्रकरणांमुळे त्यांची नोकरी धोक्यात आलीय का? असा प्रश्न विचारला जातोय.
दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (IBSNAA) ने डॉ. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यांनी ओबीसीतून अर्ज भरत खऱ्या उत्पन्नाची माहिती उघड केली नव्हती असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यासोबतच कॅटने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा खेडकर यांनी 6 वेळा वैद्यकीय चाचणी देण्यास नकार दिला होता. यासंदर्भात अहवालही मागविण्यात येणार आहे.
पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्याने प्रोबेशन पूर्ण होईपर्यंत त्या राज्य सरकारच्या पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. अशावेळी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी अशा प्रकरणांची दखल घेऊन माहिती मागवू शकते, असे म्हटले जात आहे.
पूजा खेडकर यांना या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. UPSC मार्गदर्शक तत्त्वांच्या PwBD-5 अंतर्गत सर्व निकष पूर्ण करण्यात आले आहेत की नाही याची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
दिव्यांगासाठीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा लाभ मिळावा यासाठी पूजा यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली होती. याच याचिकेत त्यांनी आपण आजारी असल्याचा उल्लेख केलेला आहे. असं असताना वैद्यकीय तपासणीसाठी टाळाटाळ केल्याचा नमूद करण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत तथ्य नसल्याचे सांगत ती फेटाळण्यात आली होती.
सामान्य कुटुंब खूप कष्ट घेतात पण तरीही सरकारी नोकर भरतीमध्ये त्यांना जाता येत नाही. कागदपत्राची फेरफार करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसे रिपोर्ट्स असतील तर सरकारने याबाबत लक्ष घालावं. पूजा खेडकर प्रकरणाची शासनाने शहानिशा करावी अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.