'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोट

Maharastra Politics : छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं.

सौरभ तळेकर | Updated: May 27, 2024, 05:40 PM IST
'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोट title=
Maharastra Politics Ajit Pawar Slam Sharad Pawar

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. अजित पवार यांनी उकरून काढलेल्या 2004 च्या राजकीय परिस्थितीवर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं होतं. त्यावेळी जर छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. अशातच आता अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

काय म्हणाले Ajit Pawar ?

2004 बद्दल पवारांनी केलेलं वक्तव्य धादांत खोटं होतं. त्यावेळेला सीएमपदासाठी मी इच्छुक नव्हतो. मात्र, भुजबळांनी राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली होती. त्यामुळे भुजबळ मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही असा गौप्यस्फोट अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलाय. 2004 साली राष्ट्रवादीचा सीएम झाला असता तर पक्ष फुटला असता, असं विधान पवारांनी केलं होतं त्यावर अजित पवारांनी गौप्यस्फोट केलाय.

शरद पवार काय म्हणाले होते?

अजित पवारांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर ते कोण चालवणार? याचा विचार आम्ही करत होतो. अजित पवार तेव्हा अनुभवाने नवीन होते. तेव्हा छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. तेव्हा मुख्यमंत्रीपदाऐवजी मंत्रीपदाच्या काही जागा आणखी मिळत असतील तर घेऊ असं ठरलं, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केलीये. विधानसभेमध्ये 80-90 जागा मिळाल्या पाहिजेत, आलो त्यावेळी त्यांनी 80-90 जागा देणार असं सांगितलं होतं. आता झाली तशी खटपट होता कामा नये, आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणालेत. ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय. नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं.