कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'

Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 11, 2024, 02:11 PM IST
कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...' title=
अजित पवारांनी मांडली आपली भूमिका मांडली (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली. हा वादा एका प्रकल्पाच्या फाइलवर सही करण्यावरुन झाल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता या कथित वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

बैठकीत नक्की घडलं काय?

अलिबाग-विरार कॉरिडोअर प्रस्तावावरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अलिबाग-विरार कॉरिडोअर हा शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंनी या प्रकल्पाच्या फाइलवर अजित पवारांनी स्वाक्षरी न केल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली. प्रकल्पाच्या प्रस्तावावर शिंदे आणि फडणवीसांनी यापूर्वीच स्वाक्षरी केलेली आहे. मात्र त्यानंतरही अजित पवारांनी अद्याप या प्रकल्पाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंनी अजित पवारांना यावरुन सर्वांसमोर इशारा देताना, 'तुम्ही सही केली नाही तर माझ्या अधिकारत करुन घेईल,' असं म्हटल्याची माहिती आहे. या वादानंतर अजित पवार चिडले आणि बैठकीतून निघून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे राज्याच्या हितासाठीचे वाद नाहीत तर

या कथित वादावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी, "महायुतीत वाद नेहमीचेच आहेत. प्रत्येक कॅबिनेटमध्ये वाद होतात. हे राज्याच्या हितासाठीचे वाद नाहीत तर स्वतःच्या हितासाठीचे हे वाद आहे," अशी टीका केली. तसेच पुढे बोलताना, "तिजोरीत पैसा नसताना 80 निर्णय घेतात. यांना कोणाची चिंता आहे? अनेक विभागांमध्ये सचिव नाहीत. कृषी विभागात सचिव नाही. मर्जीतले सचिव बसून तिजोरी लुटत आहेत," असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

अर्थ विभागाची शिस्त बिघडून...

"अजित पवारांना बाजूला सारण्याचे हे प्रयत्न असावेत. अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे. पैसे नसताना जीआर काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी केले जात आहेत," असंही वडेट्टीवार म्हणाले. 

अजित पवारांना साईड ट्रॅक करण्यासाठीच...

"अजित पवारांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत ते पाहता त्यामुळेच ते अस्वस्थ आहेत. महायुतीत तर भाजप नेते अजित पवारांना साईड ट्रॅक करण्यासाठीच भाष्य करत आहेत," असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

अजित पवार या वाद प्रकरणावर काय म्हणाले?

या कथित वादावरुन प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. "कॅबिनेटनंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते. कॅबिनेट 11 वाजता होती. नियोजित वेळेपेक्षा ती उशीरा सुरू झाली. महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्यानंरच मुख्यमंत्री शिंदे  आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून नियोजित लातूर उदगीर येथे कार्यक्रमासाठी निघालो. कॅबिनेट दहा मिनिटात सोडली ही संपूर्ण खोटी माहिती आहे," असं स्पष्टीकरण या कथित वादावर बोलताना अजित पवारांनी दिलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x