पुणे : Ajit Pawar Angry : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चांगलेच चिडलेले पाहायला मिळाले. शिवजयंतीनिमित्ताने आज शिवनेरी किल्ल्यावर मोठा सोहळा सुरु असताना काही कार्यकर्त्याने गोंधळ घालत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यत्यय आणणाऱ्या कार्यकर्त्याला चांगलेच अजित पवार यांनी फटकारले.
अजित पवार बोलत होते. भाषण सुरू करत असताना खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षण विषयाकडे लक्ष वेधले. मराठा आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी त्याने केली. त्याचे ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी भाषण सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून पुन्हा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार चिडले. आम्ही काय मराठा नाही का? आम्ही अठरा पगड जातीचे प्रतिनिधीत्व करतो, असे सांगत त्या कार्यकर्त्याला खडसावले आणि म्हणाले, तुम्ही काय सुपारी घेऊन आला का? मी ऐकून घेतले. आता तुम्ही ऐकून घ्या. आज शिवजयंती आहे, असे चालणार नाही, अशा शब्दात बजावले.
तरुणांचे रक्त सळसळत असते. परंतु सगळ्याबाबी समजून घेतल्या पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. संभाजीराजे उपोषण करायचं म्हणतात. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. यात कोणी राजकारण करु नये, असे अजित पवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही महविकस आघाडीची भूमिका आहे. नियमांचे पालन करा. शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची आहे, असे पवार म्हणाले.