शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी

Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे.  

Updated: Feb 19, 2022, 11:00 AM IST
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी title=

पुणे : Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे. कलीम गुलशेरखान, जमील पठाण, मुकुंदा सूर्यवंशी अशी अटक आरोपींची नावं आहेत. (Three arrested in teacher recruitment scam)

राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांनी टीईटी (TET) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते. मात्र, या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात टीईटीमध्ये झालेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 

TET परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे. हे तिघेही आरोपी यापूर्वी या प्रकरणात अटक केलेल्या हरकळ बंधूंच्या संपर्कात होते. यातील कलीम आणि जमील यांचा म्हाडा पेपरफुटी प्रकरणात देखील सहभाग असल्याचं समोर आले आहे. या आरोपींकडून शिक्षक भरती तसेच म्हाडा परीक्षेला बसलेल्या 128 उमेदवारांची यादी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यांनी हरकळ बंधूंना 60 लाख दिल्याची पोलीस तपासात कबुली दिली आहे.

दरम्यान, जी.ए. टेक्नॉलॉजीज या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याची चौकशी करताना पोलिसांना त्याच्याकडे TET परीक्षेतील उमेदवारांची प्रवेशपत्रे सापडली. त्यातून टीईटीच्या गैरप्रकाराचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा तत्कालीन संचालक अश्विनीकुमार शिवकुमार याला पाच कोटी रुपये मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जी. ए. टेक्नॉलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांनी गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अश्विनीकुमारला पाच कोटी 37 लाख रुपये देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.

परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह सल्लागार अभिषेक सावरीकर, माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 25 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत पोलिसांनी कोट्यवधींची रोख रक्कम, काही किलो सोने ताब्यात घेतले आहे. 2020च्या टीईटी परीक्षेचा तपास करताना पोलिसांनी पूर्वी झालेल्या टीईटीमधील घोटाळाही उघडकीस आणला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत आहे. अनेक बडे मासे पोलिसांच्या हाती लागले आहेत.