मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?

Maharashtra Politics : एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरुन खल सुरु आहे... मात्र महायुतीत जागावाटपावरुन दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत.. 

वनिता कांबळे | Updated: Sep 11, 2024, 07:52 PM IST
मैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?   title=

Ajit Pawar On Mahayuti Seat Sharing : विधानसभेसाठी महायुतीचे नेते जोरदार प्रचार करताना दिसतायत.. राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जातेय.. एकीकडे विधानसभेची तयारी सुरु आहे.. तर दुसरीकडे महायुतीत जागांवरुन दोस्तीत कुस्ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.. महायुतीत विधानसभेच्या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात महायुतीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलीय..

मात्र, अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळून लावली आहे.. मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं वैयक्तीक मत असल्याचं अजित पवार म्हणालेत.. मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आहेत. त्या जागेवर भाजपचे रविंद्र भेगडे इच्छुक आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आमदार आहेत. मात्र तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे.. मात्र भाजपकडून जगदीश मुळीकही लढण्यासाठी इच्छुक आहेत.. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडून मुरली पटेल तर शिवसेना शिंदे गटाकडून स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत.. नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत.. तर शिवसेनेकडून विजय नाहटा लढण्यासाठी इच्छुक आहेत.. 

लातूरमध्ये  अहमदपूर आणि उद्गीरच्या जागेवरुन महायुतीत वाद सुरु आहे.. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अमरावती या मतदारसंघातही महायुतीमध्ये वाद सुरू असल्याचं चित्र आहे... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा नुकतेच मुंबई दौ-यावर आले होते. त्या दौ-यात त्यांनी भाजप पदाधिका-यांच्या बैठकाही घेतल्या.. भाजपला 160 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यामुळे जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा ठरणार आहे..

विधानसभेसाठी भाजपने मिशन 125 ठेवल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे भाजपची 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदेंच्या शिवसेनेला 100च्या जवळपास जागा हव्या आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60-80 जागा हव्या असल्याचं समजतंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत जागावाटपाचा नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.