Ahmednagar Whole Village Cried For Teacher: आपल्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पाडणारी व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं फारच खास असतं. आज एकीकडे शिक्षणाचं खासगीकरण होत असतानाच ग्रामीण भागातील अनेक शिक्षक आजही अगदी तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत आहेत. मात्र अशा शिक्षकांची बदली होते तेव्हा केवळ विद्यार्थीच नाही तर संपूर्ण गाव हळहळतं. असाच काहीसा प्रकार नुकताच अहमदनगरमध्ये घडले. आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या रणजितसिंह डिसले यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतर पेजेसवरुनही शेअर होत आहे.
या व्हिडीओमध्ये शिक्षकांच्या निरोप समारंभाचं सुत्रसंचलन करणारी चिमुकली रडत रडत आपलं भाषण संपवताना दिसते. "सूर्यासारखे तळपुनी जावे या शाळेतून जाताना, भिंतीलाही पाझर यावा, निरोप घेताना", असं म्हणत ही चिमुकली ढसाढसा रडताना दिसते. तसेच या व्हिडीओमध्ये इतर गावकरीही या शिक्षकाबद्दल भरभरुन बोलताना दिसत आहेत. अगदी रात्री 2 वाजेपर्यंत हे माझ्याबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांबद्दलची चर्चा करायचे असं एक गावकरी सांगतो. भारजवाडीमधील या शिक्षकाला निरोप देताना गावातील म्हताऱ्या महिलाही त्याची गळाभेट देताना दिसतात. "मी असा माणूस पाहिला नाही. कदाचित आम्ही आमच्या लेकरांवर चर्चा केली नसेल पण यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर चर्चा केली. की हा आज शाळेत नाराज वाटला. त्याच्या घरी हे असं असं झालं असेल का ओ? आपल्या लेकराच्या नाकाचा शेंबुड आपण पुसतो पण शेजारच्याच्या लेकराची आपल्याला किळस येते. दोन भाकरींमध्येच खायचंय असं असतं तर इथं एकच भाकरीत खायचंय सगळ्यांनी मिळून तर ती खाल्ली या माणसाने. सारा वेळ वाटून टाकला ओ त्या माणसाने आयुष्याचा," अशा शब्दांमध्ये या शिक्षकाच्या कामाबद्दल गौरवोत्गार करताना गावकऱ्याला भरुन आल्यासारखं होतं.
रणजितसिंह डिसले यांनी हा व्हिडीओ शेअर करत हा शिक्षक कोण आहे याबद्दलची माहिती दिली आहे. "जागतिक पुरस्कारप्राप्त शिक्षक अहमदनगरमधील हनुमाननगर शाळेतील शिक्षक श्री. लहू विक्रम बोराटे यांची बदली झाल्यावरचा हा भावस्पर्शी व्हिडीओ. असे क्षण फक्त शिक्षकांच्या वाट्याला येतात असे म्हणावेसे वाटते," अशा कॅप्शनसहीत डिसले यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला आहे.
अहमदनगरमधील हनुमाननगर शाळेतील शिक्षक श्री लहू बोराटे यांची बदली झाल्यावरचा हा भावस्पर्शी व्हिडीओ.
असे क्षण फक्त शिक्षकांच्या वाट्याला येतात असे म्हणावेसे वाटते.#Miss_U_Sir#Respect_Teachers pic.twitter.com/YDM8r5NMsi— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) June 22, 2023
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी 12 वर्षांपासून लहू विक्रम बोराटे कार्यरत होते. ते या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेले. त्यांनी गावातील सर्व मुलांबरोबरच गावकऱ्यांनाही आपल्या कामाने आपलसं करुन घेतलं. लहू बोराटे हे फेब्रुवारी 2011 मध्ये शाळेत रुजू झाले होते. त्यानंतर तब्बल 12 वर्षे त्यांनी या शाळेमध्ये आपली शिक्षक सेवा पूर्ण केली आणि त्यांची 18 मे 2023 ला हनुमाननगर शाळेमधून बदली झाली. त्यावेळेचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.