मुंबई : नागपूर जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्राची (ॲग्रोटेक सेंटर) उभारणी नागपूर येथे करणार असल्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ॲग्रोटेक केंद्र उभारण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री @NitinRaut_INC यांनी मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद. कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देण्यासह ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन मिळणार. pic.twitter.com/mAdlSbJB8a
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 17, 2020
नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ॲग्रोटेक सेंटर उभारण्यासंदर्भात डॉ. राऊत यांची मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. हे केंद्र उभारण्याच्यादृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. हे ॲग्रोटेक सेंटर सार्वजनिक भागीदारी तत्वावर उभारले जाणार असून येथे कृषी व फळ प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे.
नागपूर व परिसराच्या कृषी क्षेत्रातील विशेष शेतमाल ज्या बाजारपेठेत मिळत नाही त्या ठिकाणी हा कृषी माल विकण्यासाठी हे केंद्र चालना देईल. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन एकाच छताखाली सर्व माहिती आणि मदत या केंद्रामार्फत करण्यात येईल, अशी माहिती टाटा टेक्नोलॉजीचे संचालक सुशिल कुमार यांनी दिली. या बैठकीला हर्षवर्धन गुणे आणि अरुण खोब्रागडे उपस्थित होते.