मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं

PM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 08:09 AM IST
मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं title=
मोदींनी सोशल मीडियावरुन केली विनंती

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी रविवारी, 9 जून रोजी तिसऱ्यांदा शपथ घेतली. नवी दिल्लीमधील राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये मोदींबरोबरच एकूण 64 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र कारभार राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो बदलले आहेत. मोदींच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरील कव्हर फोटोही बदलला असून शपथविधीनंतरचा संपूर्ण मंत्रीमंडळाचा फोटो त्यांनी कव्हरला ठेवला आहे. आपला प्रोफाइल फोटोही मोदींनी बदलला असून पिवळ्या मोदी जॅकेटमधील नवा प्रोफाइल फोटो त्यांनी ठेवला आहे. तसेच त्यांनी आपल्या समर्थकांना एक विनंतीही केली आहे.

मोदींनी नेमकं काय म्हटलं आहे?

मोदींनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, "निवडणूक प्रचारादरम्यान देशातील अनेकांनी माझ्याबद्दल आपुलकीचे प्रतीक म्हणून त्यांच्या सोशल मीडियावर 'मोदी का परिवार' हे शब्द जोडले होते. या कृतीमधून मला फार बळ मिळाले. भारतीय जनतेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे. हा एक प्रकारचा विक्रम आहे. या निकालाच्या माध्यमातून जनतेनं आम्हाला आपल्या देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश दिला आहे," असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलातना मोदींनी, "आपण सर्व एकाच कुटुंबाचा भाग आहोत हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल मी पुन्हा एकदा भारतातील लोकांचे आभार मानतो आणि विनंती करतो की आपण आता आपल्या सोशल मीडियावरील नावांमधून 'मोदी का परिवार' हे शब्द हटवावेत. सोशल मीडियावरील हे नाव बदलू शकते, मात्र भारताच्या प्रगतीसाठी झटणारा एक परिवार या नात्याने आपला संबंध मजबूत आणि अतूट आहे," असं मोदींनी म्हटलं आहे.

कुठून सुरु झाला हा ट्रेण्ड?

निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान पटण्यात 3 मार्च रोजी महागठबंधनच्या रॅलीत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधताना कुटुंबाचा उल्लेख केला होता. मोदी घराणेशाहीवर टीका करतात, पण त्यांना स्वतःचं कुटुंब का नाही? असा सवाल लालू प्रसाद यादव यांनी विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर भाजपाने 'एक्स'वरील सोशल मीडियावरुन 'मोदी का परिवार' अशी अक्षरं आपल्या नावापुढे जोडून केला होता. अगदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आपल्या नावामध्ये बदल केला होता. आता मोदींनी ही तीन अक्षरं नावातून काढण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून ही तीन अक्षरं काढली आहेत.