मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलनांचा धुराळा उडत असताना, आता धनगर समाज, लिंगायत समाज,ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. शिवाय त्यात मु्स्लिमसमाजानेही पाच टक्के आरक्षणाची जुनी मागणी पुन्हा एकदा पुढे केली आहे, येत्या १० ऑगस्टपासून त्यासाठी जेलभरो आंदनलन करण्यात येणार आहे. लातूरमध्ये मुस्लीम समाजाच्या घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला लातूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील सर्व पक्षीय संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
मुस्लीम समाजाला रंगनाथ मिश्रा कमिशन, सच्चर कमिशन आणि डॉ महेमदुर्रहमान कमिशन यांच्या रिपोर्टवर आधारीत शिक्षण , नोकरी आणि राजकारणात आरक्षण मिळावे यासाठी रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन करण्यात येतील असा इशारा देण्यात आलाय.
विशेष म्हणजे मुस्लिम समाजाच्यावतीने मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणालाही या बैठकीत पाठिंबा देण्यात आलाय.
लिंगायत समाजही आरक्षणासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे लिंगायत धर्म संमेलन घेण्यात आले. या संमेलनात स्वत्रंत लिंगायत धर्म मान्यता देऊन लिंगायत धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. त्यासाठी येत्या १३ ऑगस्टपासून श्रावणातील पहिल्या सोमवारी राज्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इष्टलिंग पूजा करून लिंगायत समाजातर्फे आंदोलनाला सुरुवात करणार आहे.
शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर महाराज यांच्या नेतृवात हे आंदोलन पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. विशेषबाब म्हणजे लिंगायत समाजाने मराठाआणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला आहे.