Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'

Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 28, 2024, 01:18 PM IST
Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...' title=

Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे  समर्थक भिडले आहेत. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मोर्चाची घोषणा करण्यात आली असतानाच केंद्रीय मंत्री नाराणय राणे राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. दरम्यान त्याचवेळी आदित्य ठाकरेदेखील आले आणि काही क्षणात ठाकरे आणि राणे समर्थक आपापसात भिडले. आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप केला आहे. तसंच उंचीप्रमाणे बालबुद्धी असा टोला लगावला आहे. 

राड्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे फार दुर्देवी आणि बालिशपणाचं आहे. एका कॅमेऱ्यामनला धक्काबुक्की झाली आणि त्यातून सुरुवात झाली. मी कार्यकर्त्यांना महाराजांच्या किल्ल्यात राजकारण करायचं नाही सांगत अडवलं आहे". मला या बालिशपणात जायचं नाही. त्यांची हीच शिकवण आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. 

आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची असाही संताप त्यांनी व्यक्त केला. दरम्यान तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होता का? अशी विचारणा केली असता आदित्य ठाकरे म्हणाले की, "माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत".

आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपावाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. जे झालं आहे ते व्हायलाच नको होतं. जगात समुद्रकिनारी असणारे अनेक पुतळे आहेत. ते आपटे कुठे आहेत? त्याला कोणी पळून जायला मदत केली आहे का? याची उत्तरं मिळायला हवीत. पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल केला आहे का?". 

 

"जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढला. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे," अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. म्हणजे याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. यांना मंत्री म्हणून फिरताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही असताना या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.