Father And Son Suicide Case: काही महिन्यांपूर्वी भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-मुलाने धावत्या ट्रेनखाली आत्महत्या केली होती. वसईतील पिता-पुत्राने अखेर आत्महत्या का केली? याचे गूढ कायम होते. मात्र आता या पिता-पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे. समाजातील बदनामीच्या भितीने दोघांनीही हा टोकाचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे.
हरिष मेहता आणि त्यांचा मुलगा जय मेहता हे वसईच्या वसंत नगरी येथे राहत होते. 7 जुलै रोजी मेहता बाप-लेकाने भाईंदर रेल्वे स्थानकात चर्चगेट-विरार लोकलखाली आत्महत्या केली. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहे. आत्महत्या करताना जात असतानाची ते सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी आधारकार्डवरुन दोघांचीही ओळख पटवली होती. दोघांनीही आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न सतावत होता. अखेर या प्रकरणाचे गूढ समोर आले आहे.
हरीश हे सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये काम करत होते. जय हा एका शीतपेय कंपनीत काम करत होता. हरीश यांच्या पत्नीचे निधन झाले होते. जयचेही वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. हरीश आणि जय यांनी आत्महत्या केल्यानंतर शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता त्यांच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, जय मेहता याने अंतरधर्मिय विवाह केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर समाजात बदनामी होईल, या भीतीने दोघांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झालं आहे. जयचा फोन, कार्यालयात सापडलेली डायरी आणि त्याच्या दोन्ही पत्नीने दिलेल्या जबानीतून हा खुलासा झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय मेहता याचे एका मुस्लिम तरुणीशी मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी लग्नदेखील केले होते. परंतु, समाजात या लग्नाला मान्यता मिळणार नाही म्हणून त्याने पहिल्या पत्नीला कधी समोर आणलं नाही. तसंच, तिला अंधारात ठेवून दाक्षिणात्य मुलीशी प्रेमविवाह केला होता. मात्र, जयच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याच्या पहिल्या पत्नीला ही बाब विचारताच तिने त्याला जाब विचारला. तसंच, तिच्याशी संबंध तोड असा दबाव टाकण्यास सुरुवात केली.
दरम्यान, दुसऱ्या पत्नीलाही जयच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यामुळं त्यांच्यातही वाद होत होते. पहिला पत्नी सतत दबाव टाकत होती तसंच, हे प्रकरण सर्वांना कळल्यानंतर समाजात बदनामी होईल, अशी भीती दोघांना होईल. त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच, जयच्या कार्यालयात एका डायरीत त्याने दोन्ही पत्नींसाठी पत्र लिहलं होतं. त्यात त्याने दोघींचीही माफी मागितली होती.
पोलिसांनी या प्रकरणात जयच्या फोनचे तपशील मिळवले आहेत. तसंच, त्याच्या डायरीतूनही या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी त्याच्या दोन्ही पत्नींचे जबाब नोंदवले आहेत. मात्र कोणीही तक्रार नसल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.