भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

40 गद्दार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवसेनेशी गद्दारी करणा-या 40 जणांचं करिअर संपवलं, ते बाद होणार, असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान, सरकार पाडून नेमकं काय मिळवलं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी भाजपला केला होता.

Updated: Jan 11, 2024, 04:46 PM IST
भाजपाच्या सर्वोच्च नेत्याच्या भेटीसाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न, शिंदे गटाचा गौप्यस्फोट title=

Shiv Sena MLA Disqualification :  विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता निकालात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  निकालनंतर ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल अन्यायकारक असल्याचं जनतेत जाऊन मांडा असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर, दुसरीकडे या निकालानंतर शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप

शिंदे गटानं आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपच्या सर्वोच्च नेत्याची वेळ मागितलीय असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

आमदार अपात्रता निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाची रणनीती

आमदार अपात्रता निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटानं रणनीती आखलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल कसा अन्यायकारक आहे हे ठाकरे गट जनतेत जाऊन मांडणार आहे. त्यासाठी लवकरच कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. मातोश्रीवर ठाकरे गटाच्या दिग्गजांची यासंबंधी बैठक झाली, 26 जानेवारीपासून नेत्यांचे दौरे सुरु होणार आहेत. 

मशाल चिन्ह ही ठाकरेंच्या हातातून जाणार?

आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला... मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार समता पक्षही आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा दावाही समता पक्षाने केलाय. तेव्हा आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता निकालात शिवसेना शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला.  यावरुन आता ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 2 018 मध्ये शिवसेना पक्षात केलेल्या घटनाबदलांची नोंद निवडणूक आयोगात नसल्याचा मुद्दा अध्यक्षांनी निकालावेळी वाचून दाखवला.. यावरुन आता ठाकरे गटात खडाजंगी सुरु आहे. अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होता. मात्र निवडणूक आयोगात घटना बदलाची प्रत सोपवली असेल तर त्याची प्रत पत्रकार परिषदेत सादर करावी. नाहीतर देसाईंना जाब विचारावा अशी मागणी एका गटाने उद्धव ठाकरेंकडे केलीय. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत, सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेत कसलीही धुसफूस नसल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय.