Abhijit Bichukale on CM Post: कवी मनाचा नेता अशी ओळख सांगणारा बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिचुकलेने (Abhijit Bichukale) राज्यातील राजकीय परिस्थितीवर (Maharashtra Politics) भाष्य केलं आहे. राज्यामधील सत्तासंघर्षावर भाष्य करताना बिचुकलेने एक जालीम उपाय सुचवला आहे. राज्यातील सर्व राजकीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माझ्या पत्नीला मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) करा. माझ्या पत्नीला मुख्यमंत्री केल्यास राज्यातील सर्व प्रश्न सुटतील असा दावा बिचुकलेने केला आहे. बिचुकलेने पुण्यामध्ये आंदोलन करत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं त्याने जाहीर केलं.
राज्यातील संघर्षासंदर्भात भाष्य करताना बिचुकलेने, "मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचाच आहे. त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या बायकोला राज्याची मुख्यमंत्री केलं तर सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वात आधी सोडवला जाईल," असं म्हटलं. आयोगाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सामंजस्याने मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग 2023 म्हणतंय तर विद्यार्थी 2025 म्हणत आहेत. मात्र यामध्ये मधला मार्ग काढून 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करावा, अशी मागणी बिचुकलेने केली.
बिचुकले कसबा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. मला निवडणूक महत्त्वाची नसून विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याने मी पाठिंबा देण्यासाठी इथं आलो आहे, असंही यावेळी बिचुकलेने नमूद केलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढणं अधिक महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला आहे. सध्या या विषयावरुन राजकारण सुरु असून आम्हाला यात रस नाही. आम्हाला विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे, असंही या अभिनेत्याने स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एमपीएससीच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार होते. यावेळी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक रद्द झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार होते. मागील चार दिवसांपासून एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. कालच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारचा पाठिंबा असून यासंदर्भातील पत्रव्यवहार एमपीएसीबरोबर सुरु असल्याचं मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नमूद केलं होतं.