Gautami Patil Dance : सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील (Gautami Patil) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सातारा कोर्टात (satara district court) या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी देखील गौतमी पाटील हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची करण्यात आली होती. मात्र, आता थेट न्यायालयातर्फे गौतमी पाटीलविरुद्ध कारवाई करण्याची करण्यात आली आहे.
गौतमी पाटील हिच्या विरोधात कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, या मागणीचा अर्ज सातारा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी हा अर्ज दाखल केला आहे. शेंद्रे-सोनगाव येथे 21 डिसेंबरला लावणी कार्यक्रमात पार पडला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने अश्लिल नृत्य केल्याचा आरोप आहे.
या लावणी कार्यक्रमात गौतमी पाटीलने नृत्य सादर करताना वारंवार अश्लील चाळे केले. सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी गौतमी पाटीलविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 294 गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रतिभा शेलार यांनी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर 23 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. गौतमी तिच्या डान्सचे छोटे छोट्या क्लिप सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले आहेत. लावणी सम्राज्ञी असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी देखील यावरुन गौतमीची कानउघाडणी केली होती. अश्लिल हावभावांमुळे गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रविकास सेनेने गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
गौतमी पाटीलने जाहीर माफी मागत अश्लिल नृत्याच्या आरोपावर खुलासा केला होता. माझा कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त पुरुष नाही तर महिला देखील येतात. सर्व प्रकारचे प्रेक्षक माझ्यावर भरभरुन प्रेम करतात. त्यांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होते असं गौतमी म्हणाली होती. मी चुकले होते, याबाबत मी माफी मागितली होती. मी एक कलाकार आहे. मी अश्लिल काही करत नाही असं गौतमी पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाली होती.
काही महिन्यांपूर्वी सांगली येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली होती. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे गौतमीवर कारवाईची मागणी केली होती.