चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ

सोलापुरात जमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापून गावभर फिरला.  

शिवराज यादव | Updated: Dec 13, 2023, 05:08 PM IST
चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ title=

सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापलं. इतकंच नाही तर हे मुंडकं घेऊन तो बाईकवरुन गावभर फिरत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याने जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीने वार करत चुलत्याची हत्या केली. शंकर जाधव अशी चुलत्याची ओळख पटली आहे. हत्या केल्यानंतर त्याने चुलत्याचं मुंडकं कापलं आणि ते बाईकवर घेऊन फिरला. जवळपास दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता. हे चित्र पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 पथकं त्याच्या मागावर पाठवण्यात आली होती. पोलीस पाठलाग करत आहेत हे समजल्यानंतर आरोपीने माळीनगर येथे मुंडकं आणि दुचाकी फेकून दिली. पण अखेर त्याने माळीनगर येथे पोलिसांकडे शरणागती पत्करली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.