चक्क किल्ल्याला लावला महाकाय दरवाजा, तरुण मावळ्यांची शिकस्त

एक हजार किलोचा दरवाजा जमिनीपासून २९०० फुट उंचीवर चढविला ६० मावळ्यांचा पराक्रम

Updated: Dec 21, 2021, 11:37 AM IST
चक्क किल्ल्याला लावला महाकाय दरवाजा, तरुण मावळ्यांची शिकस्त title=
१. त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाकाय दरवाजा चढवताना मावळे. 2. प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला दुर्ग दरवाजा

सध्या तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्यांबद्दल आदर आणि सन्मान मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याच किल्ल्यांचे संरक्षण आणि जपवणूक करण्यासाठी शिवाजी महराजांचे मावळे सध्या एकत्र आले आहेत. या मावळ्यांनी जमिनी पासून २९०० फुट उंचीवर असलेल्या किल्ल्यावर एक हजार किलोचा दरवाजा चढवत किल्ल्याचा महाप्रवेश द्वार म्हणून लावण्यात आला आहे.

हे महाप्रवेश द्वार सागवान लाकडाचा वापर करून तयार करण्यात आले आहे. ह्याची उंची ८.५ फुट आणि रुंदी 3.४ फुट आहे. तर याचे वजन एक हजार किलो असून याची अंदाजे किंमत पावणेदोन लाख रुपये आहे. रविवारी (१९ डिसेंबर) हर हर महादेवचा जयघोष करत दुर्गार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गडकिल्ले आहेत. या किल्ल्यांचे संरक्षण सध्या तरुणाई करताना दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी तसेच रायगडा वर जाण्याची तरुणांची क्रेझ दिसून येते तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले बघायला मिळतात त्यामुळे नाशिकला किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.

याच जिल्ह्यातील ३२३८ फुट उंचीचा त्रिंगलवाडी किल्ल्याच संरक्षण करण्यासाठी अनेक मावळे पुढे सरसावले आहेत. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारचे नुकसान झाल्याने किल्ल्याची हानी होत असल्याच मावळ्यांच्या लक्षात आले. किल्ल्याचे संरक्षण व्हावे या करिता गडकिल्ले संरक्षक एकत्र आले. या सर्वांनी एकत्र येत प्रवेशद्वार बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली आहे.

रविवारी (१२ डिसेंबर) रोजी सकाळी या अभियानाला सुरवात करण्यात आली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा दरवाजा किल्ल्यावर चढवण्यात आला आहे. चढण्यासाठी अवघड असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर अवघ्या सात तासात दरवाजा चढवला आहे. हा एक हजार किलोचा दरवाजा वाहून नेण्यासाठी साठ मावळे आणि त्यांचे १२० हात असल्याने अगदी सहज हा दरवाजा किल्ल्यावर नेण्यात आला आहे.

ईगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे. त्याचे बरेचसे भाग तुटून पडले आहेत तर काही मोडकळीस आले आहे. या किल्ल्यावर आजही बऱ्याच ऐतिहासिक काळाच्या जुन्या खुणा दिसून येतात हा किल्ला इ. स. १६७७ च्या शेवटी मोगलांनी जिंकला होता. मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी किल्ला उद्धवस्थ केला होता.

त्रिंगलवाडी किल्ल्याची होणारी हानी टाळण्यासाठी सह्यान्द्री प्रतिष्ठान आणि दुर्गप्रेमी यांच्या प्रयत्नांन किल्ल्याला महाप्रवेश द्वार बसवण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले आजही भग्नावस्थेत आहेत. आता गरज आहे ती सर्व शिवप्रेमी आणि गडकिल्ले संवर्धकानी एकत्र येत गडकिल्ले वाचविण्याची.