Dombivli News : खेळता खेळता पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली मधील हाय प्रोफाईल सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या मजल्यावरुन पडून या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देणे गरजेचे आहे.
सक्षम उंडे असे मृत्यू झालेल्या चिमूरड्याचे नाव आहे. सक्षम हा भरत उंडे यांचा एकुलता मुलगा होता. सक्षम हा कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या प्ले झोन मध्ये खेळत असताना तो अचानक खाली पडला. इथल्या कामगारांचे सक्षमकडे लक्ष जाताच त्यांनी सक्षमला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून पडून एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झालीय. तकदीस सईद अहमद मोमिन ही गॅलरीमध्ये स्टूल लावून लोखंडी जाळीतून बाहेर डोकावत होती. तोल जाऊन तकदिस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. स्थानिकांनी तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
12 वर्षाच्या मुलाचा सातव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू
पिंपरी चिंचवड मध्ये खेळत असताना 12 वर्षाच्या मुलाचा सातव्या मजल्यावरच्या गॅलरीतून पडून मृत्यू झालाय. अथर्व गावडे असं मृत्यूमुख पडलेल्या मुलाचं नाव आहे. अथर्व सायंकाळी त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता. तेंव्हा आई घरकामात व्यस्त होती. खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला आणि तोल जाऊन तो खाली पडला यात त्याचा मृत्यू झाला.
दहीहंडी सुरू असताना एका 9 वर्षीय चिमुकलीचा गॅलरीतून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. देऊळगाव राजा शहरातील मानसिंग पुरामध्ये ही घटना घडली. बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीला दहीहंडीचा दोर बांधला होता. या दोराला एक युवक लटकल्यानं सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळली. दरम्यान गॅलरीत उभी असलेल्या चिमुकलीचा तोल गेला आणि ती खाल कोसळली आणि यात ती जागीच ठार झाली. तर या दुर्घटनेत आणखी एक मुलगी जखमी झालीये. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाल्या.