मुंबई: राज्यात गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६४२७ इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यात १४ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील ६, पुणे ५, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत ८४० जण पूर्णपणे बरे झाले आहेत, ही एकमेव दिलासादायक बाब आहे.
धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार, माहीममध्ये आणखी सहाजणांना लागण
आज राज्यभरात नोंद झालेल्या नव्या रुग्णांपैकी ५२२ जण हे मुंबईतील आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२०५ इतका झाला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी राज्याच्यादृष्टीने अतिश्य महत्त्वाचा आहे. या काळात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
दरम्यान, मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावीत आजही २५ नवे रुग्ण आढळून आले. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा २१४ इतका झाला आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईतील अनेक परिसर दाटीवाटीचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे.