5 Died In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागल तालुक्यातील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा होऊन सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. याशिवाय करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही अन्नातून विषबाधा झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जणांना प्राण गमवावे लागल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कागलमधील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला. एका नातेवाईकाने आणलेल्या कप केकमधून त्यांना ही विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच पोलिसांनी अगदी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवले आहे. मरण पावलेल्या चिमुकल्याचं नाव श्रीयांश असं आहे. पोलिसांनी श्रीयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर श्रीयांशची बहीण काव्याच्या मृतदेहाचेही शवविच्छेदन करण्यात आलं आहे. या दोन्ही बहीण-भावाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. दोघांच्या मृत्यूच्या कारणाचं निदान करण्यासाठी व्हिसरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दुसरीकडे करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही विषबाधेमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रकरणं समोर आल्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घातलं आहे. दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत दोन्ही घटनांत विषबाधेसाठी कारणीभूत ठरलेलं अन्न नेमकं कुठून आलं होतं? त्याचं उप्दान कुठे झालं होतं? याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, काहीही कारण नसताना चिमुकल्यांनी प्राण गमवल्याच्या वृत्ताने पंचक्रोषित हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
> मळमळ आणि उलट्यांचा त्रास.
> ओटीपोटात पेटके आणि गुदाशयात वेदना होणे.
> एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकणारा अतिसाराचा त्रास.
> विष्टेमध्ये रक्त किंवा पू पडणे.
> ताप आणि थंडी वाजून येणे.
> चक्कर येणे.
> डोकेदुखी आणि स्नायू दुखी.
> शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणे.
> सतत तहान लागणे.
> अशक्तपणा आणि थकवा.
> लघवीचं प्रमाण कमी होणे थोडे किंवा लघवीच न होणे.