मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल असतील, अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झालीय.
'टोल'च्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सातत्याने राजकारण तापत असतं. अशा परिस्थितीत आता नव्याने होणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल ३१ टोल अस्तित्त्वात येतील, अशी माहिती 'आरटीआय'मधून उघड झालीय.
त्यामुळे हा महामार्ग अस्तित्त्वात आला तरी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जवळपास १५०० ते २००० रुपये केवळ टोलसाठी द्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत आरटीआय कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी ही माहिती दिलीय.
मुंबई ते नागपूर असा जवळपास ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाच्या वादावरून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. पाच भागांमध्ये हा ७०० किलोमीटरचा महामार्ग तयार होणार आहे.
- मुंबई-नागपूर सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग सुमारे ७१० किमी लांबीचा महामार्ग
- खर्च अंदाजे ४६ हजार कोटी
- या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर १६ तासांऐवजी आठ तासांत होणार पूर्ण
- १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावांतून जाणार महामार्ग
- सुमारे २० हजार ८२० हेक्टर जमीन करावी लागणार संपादित
- नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून जाणार महामार्ग
- १६ पॅकेजसमध्ये होणार काम
- ऑक्टोबर २०१७ ला काम सुरू करून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस
- या मार्गासाठी मोजावा लागणार आता भरमसाठ टोल