आयुष्य संपवण्याआधी नितीन देसाईंनी कोणाला पाठवल्या 'त्या' 11 ऑडिओ क्लिप? त्यांचा प्रत्येक शब्द करणार मोठा उलगडा

Nitin Desai : नितीन चंद्रकांत देसाई ऊर्फ एनडी यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी पहाटेच आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यानंतर आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

आकाश नेटके | Updated: Aug 3, 2023, 07:55 AM IST
आयुष्य संपवण्याआधी नितीन देसाईंनी कोणाला पाठवल्या 'त्या' 11 ऑडिओ क्लिप? त्यांचा प्रत्येक शब्द करणार मोठा उलगडा title=

Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसोबतच भारतातील चित्रपट रसिकांनाही जोरदार धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या अशा धक्कादायक एक्झिटने ते आज नाहीत यावर अनेकांना विश्वासच बसायला तयार नाही. देवदास, लगान, जोधा अकबर आणि हम दिल दे चुके सनम यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे सेट डिझायनर असलेले नितीन देसाई स्वत:चे दुःख आणि समस्या सांगू शकतील अशी जागा तयार करु शकले नाहीत. त्याची परिस्थिती इतकी बिकट बनली की त्याला जीवनापेक्षा मृत्यू परवडणारा वाटला आणि त्यांनी आत्महत्या केली.

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या रायगड पोलिसांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काही ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत असे सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांची नावे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या असून त्यात चार नावांचा उल्लेख असल्याचे म्हटलं जात  आहे.  त्या ऑडिओ क्लिप नितीन देसाई यांनी त्यांच्या परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

काय आहे 'त्या' 11 ऑडिओ क्लिपमध्ये?

आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी तब्बल 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नितीन देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी या ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठवल्याचे म्हटलं जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये स्टुडिओचा ताबा देऊ नका, असे म्हटलं आहे. तसेच कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे त्यांनी क्लिपमध्ये म्हटलं आहे.  कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

250 कोटी रुपयांचे कर्ज

आर्थिक विवंचनेला कंटाळून नितीन देसाई यांनी गळफास घेतल्याचे म्हटलं जात आहे. बुधवारी सकाळी त्यांच्या स्टुडिओच्या अंगरक्षकाने बंद खोलीच्या खिडकीतून डोकावले असता खोलीच्या पंख्याला त्यांचा मृतदेह लटकलेला होता. नितीन देसाई आर्थिक संकटाशी झुंजत होते. त्यांनी बँकेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, जे व्याजासह सुमारे 250 कोटी रुपये झाले होते. नितीन देसाई यांनी ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांनी वसुलीसाठी कायदेशीर पावलेही उचलली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वसुलीसाठी नितीन देसाई यांचा स्टुडिओ जप्त करण्याची मागणीही केली होती.