मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!

Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 10, 2024, 01:15 PM IST
मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार! title=

लहान मुलांच्या हायजीनची विशेष काळजी घ्यावी लागते. नाजूक त्वचा, नवीन दात यासगळ्या गोष्टींची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. अशावेळी मुलांचे हट्ट हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक असतात. जसे की, काही वेळेला मुलं दात न घासण्याचा हट्ट करतात. एवढंच नव्हे तर त्यांना ब्रश न करताच खायचं असतं. अशावेळी त्यांना ओरडणे किंवा मारणे योग्य नाही. ही परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळली पाहिजे. 

मुलांना ब्रश करायचा नसतो? अशावेळी त्यांना ब्रशचे महत्त्व आणि दातांचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे बोलून सांगा. कारण बोलण्याने बऱ्याच गोष्टी सुरळीत होतात. लहानपणीच मुलांचे सगळे हट्ट ऐकले की, त्यांना त्याची सवय होते. तसेच शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व देखील मुलांना पटवून सांगायला हवे. 

3 ते 6 वर्षांपर्यंत लहान मुलांच्या दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण या दिवसांमध्येच कॅव्हिटीज आणि गम्सच्या समस्या उद्भवतात. मुलं कायमच पालकांना लक्ष देऊन पाहत असतात त्यांच्याप्रमाणे त्यांच अनुकरण करत असतात. अशावेळी पालकांनी देखील मुलांसोबत दात घासावेत. ही ऍक्टिविटी पालकांनी मुलांसोबत दोन वेळा करावी. 

तसेच मुलांना पालकांनी दात न घासल्यामुळे काय समस्या उद्भवतात, हे फोटोच्या रुपात दाखवावे. कारण फोटोंमधून मुलांना त्याची तीव्रता अधिक कळते. मुलांना न ओरडता न मारता ही कृती तुम्ही करुच शकता. त्याचप्रमाणे शिक्षक आणि डॉक्टर ही व्यक्तिमत्त्व मुलांसाठी आदर्श व्यक्तीसमान असतात. अशावेळी तुम्ही डॉक्टरांशी बोलून मुलांना दातांच्या स्वच्छतेचे महत्त्व शिकवावे. पण तरी देखील मुलं खूप हट्टीपणा करतात अशावेळी त्यांना थेट बाथरुममध्ये नेऊन दात घासावेत, जेणे करुन मुलांना आपण आपल्या मतांवर ठाम असल्याचे कळते.  

पालकांनी मुलांना तोंडाचे चार भागाच्या स्वरुपात दात घासायला लावावेत. तसेच ब्रश केल्यानंतर मुलांना गुळण्या करायला देखील सांगा. तसेच ब्रश 2 ते 3 मिनिटे करणे अपेक्षित असल्याचं सांगा. त्यामुळे या वेळेत त्यांच्यासोबत काऊन्टिंग करा किंवा त्यांच्या आवडीची कविता म्हणा. यामुळे मुलं हसत खेळत ब्रश करायला शिकतात.

दातांसोबतच जीभ देखील स्वच्छ करणे आणि घासणे तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे मुलांना जीभ स्वच्छ करायला देखील सांगा. अशावेळी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ चूळ भरून तोंड धुवायला सांगा. एवढंच नव्हे तर मुलांच्या जीभेखाली साचलेली घाणे देखील दुर होते.