होळीसोबतच लागून येणारा सण म्हणजे धुळवड. धुळवड हा सण रंगांचा आणि विशेष करुन प्रेमाचा सण आहे. आख्यायिकेनुसार होळी, धुलिवंदन या दिवसांमध्ये श्रीकृष्णाला देखील विशेष महत्त्व आहे. होळीच्या दिवसांमध्ये किंवा कोकणात साजऱ्या होणाऱ्या शिमगोत्सवापर्यंत जर घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही त्याला श्रीकृष्णाच्या नावावरुन नाव ठेवू शकता. यासाठी 'क' अक्षरावरुन मुलांची नावे ठेवू शकता. जाणून घ्या कृष्णाची वेगवेगळी नावे आणि अर्थ.
प्राचीन दंतकथांनुसार भगवान श्रीकृष्णाचा रंग गडद आणि राधा राणी गोरी होती. श्रीकृष्णाने याविषयी आई यशोदेकडे अनेकदा तक्रार केली आणि आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करून टाळत राहिली. पण तो न पटल्यावर आईने राधाच्या चेहऱ्यावर तुझ्यासारखाच रंग लावा, असे सुचवले. मग तुझा आणि राधाचा रंग सारखाच असेल. खट्याळ कृष्णाला त्याच्या आईची ही सूचना खूप आवडली आणि त्याने आपल्या मित्र गोपाळांसोबत काही अनोखे रंग तयार केले आणि राधा राणीला रंग देण्यासाठी ब्रज गाठले. श्रीकृष्णाने आपल्या मित्रांसह राधा आणि तिच्या मित्रांना रंग लावला. ब्रजच्या लोकांना त्याचे खोडकरपणा खूप आवडला आणि तेव्हापासून रंगीबेरंगी होळीचा ट्रेंड सुरू झाला. जो आजही तितक्याच उत्साहाने खेळला जातो.