Coffee Impact: तुम्ही अनावश्यक खरेदी करत असाल आणि तुम्ही जर तुमची ही सवय नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल तर खरेदी करण्यापूर्वी कॉफी पिणे टाळा. कारण एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की कॅफिनच्या सेवनामुळे तुम्ही काय खरेदी करता आणि खरेदी करताना तुम्ही किती खर्च करता यावर परिणाम होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा (यूएसएफ) यांच्या नेतृत्वात एक संशोधन करण्यात आले आहे. त्यात काही लोकांना कॅफिनयुक्त कॉफी प्यायला दिली तर काहींना कॅफिन नसलेले साधारण पेय किंवा पाणी प्यायला दिले. पण त्यात असे आढळून आले की खरेदी करण्यापूर्वी एक कप कॅफिनयुक्त कॉफी प्यायलेल्या लोकांनी दुसरे पेय किंवा पाणी प्यायलेल्या लोकांच्या तुलनेत सुमारे 50 टक्के जास्त पैसे खर्च केले आणि जवळपास 30 टक्के जास्त वस्तू खरेदी केल्या. मार्केटींग संबंधीत एका मासिकात नमुद करण्यात आले आहे की, यामुळेच सध्या दुकानांच्या एंट्रन्सला कॉफी बार ठेवण्याचा ट्रेंड वाढत आहे.
कॅफीनचे सेवन केल्याने आपल्या शरीरात खूप ऊर्जा तयार होते. ज्यामुळे आपण स्वतःला खरेदी करण्यापासून थांबवू शकत नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कॅफीन एक शक्तिशाली उत्तेजक आहे. ते मेंदूमध्ये डोपामाइन सोडते, ज्यामुळे मन आणि शरीर उत्तेजित होते. त्यामुळे आपले स्वतःवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच कॅफीनचे सेवन केल्यानंतर जास्त खरेदी केली जाते आणि खर्चही जास्त होतो. अनेकवेळा या संबंधीत संशोधनही झाले आहे. त्यात हेच सिद्ध झाले आहे की कॅफीनच्या सेवनानंतर ग्राहक जास्त वस्तू खरेदी करतात आणि जास्त पैसेही खर्च करतात.
दुकानात जाऊनच नाही तर, संशोधकांना ऑनलाईन शॉपिंग दरम्यान कॅफीनच्या सेवनाने जास्त खरेदी होते असेच आढळले आहे. एका बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आले होते त्यातूनही असे समोर आले, की कॅफिनयुक्त कॉफीचे सेवन केलेल्या विद्यार्थ्यांनी इतरांच्या तुलनेत जास्त वस्तू खरेदी केल्या आणि जास्त खर्चही केला.
संशोधकांनी नमूद केले आहे, की मध्यम प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्यास चांगले फायदे होऊ शकतात, पण खरेदी करताना कॅफीन घेतल्याने वेगळेच परिणाम बघायला मिळतात. म्हणूनच, जे लोक आपल्या खर्चावर नियंत्रण करण्याचा आणि अनावश्यक खरेदी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी खरेदीला जाण्यापूर्वी किंवा ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी कॉफी पिणे आणि कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे.