प्रत्येक पाचव्या भारतीयाचा आज वाढदिवस... 1 जूनला एवढ्या लोकांचा वाढदिवस का असतो, माहितीये का?

Why So Many Indians Have 1st June As Common Birthdate: फेसबुक असो किंवा व्हॉट्सअप तुम्ही आज अनेक ठिकाणी नुसत्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या स्टोरी आणि पोस्ट पाहत असणार तुमच्या ओळखीतील किती लोकांचा आज म्हणजेच 1 जून रोजी वाढदिवस आहे? भरपूर साऱ्या लोकांचा ना? पण 1 जूनला अनेकांचा वाढदिवस का असतो तुम्हाला ठाऊक आहे का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 1, 2024, 10:09 AM IST
प्रत्येक पाचव्या भारतीयाचा आज वाढदिवस... 1 जूनला एवढ्या लोकांचा वाढदिवस का असतो, माहितीये का? title=
आज तुमच्या ओळखीत किती लोकांचे वाढदिवस आहेत?

Why So Many Indians Have 1st June As Common Birthdate: खरं तर 1 जून रोजी रात्री बाराच्या ठोक्यापासूनच व्हॉट्अप ग्रुपवर किंवा कॉनटॅक्ट लिस्टमधील व्हॉट्सअप तसेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर वाढदिवसाच्या पोस्ट पाहायला मिळतात. अर्थात तुमच्या ओळखीतल्याही एखाद्याचा खरं तर अनेकांचे वाढदिवस (Birthday) आज म्हणजेच 1 जून रोजी (Birthday on 1st June) असेलच. फेसबुक वॉलपासून ते व्हॉट्सअप ग्रुप्सवरही खास करुन तुमच्या फॅमेली ग्रुप्सवर सकाळपासूनच शुभेच्छांचा पाऊस पडत असणार यात काहीच शंका नाही. पण 1 जूनला एवढ्या लोकांचा वाढदिवस असण्याचं नेमकं कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना? याच संदर्भात वाढदिवसांच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊयात...

1 जून वाढदिवस असण्याचं मुख्य कारण काय?

एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक 5 व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस हा 1 जून रोजी असतो. आता यामागील कारण अगदीच सूचक शब्दांमध्ये सांगायला गेल्यास पु.ल. देशपांडे यांचं एक वाक्य पुरेसं आहे. "जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!" असं पुलंनी एका ठिकाणी म्हटलं आहे. आता या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न असेल तर 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा वाढदिवस म्हणजे 'ऑन पेपर बर्थ डे' असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे1970 च्या दशकाच्या आसपास अगदी 50 ते 55 वर्षांपूर्वीपर्यंत सध्या ज्या पद्धतीने जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते तसा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला वगैरे प्रकारही फारसा अस्तित्वात किंवा आता इतका महत्त्वाचा आहे तितका महत्त्वाचा दस्तावेज नव्हता. त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधाही फारश्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळेच बहुतांश महिलांची प्रसुती ही सुईणींच्या मदतीने घरच्या घरीच व्हायची. त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असण्याचा फारसा संबंध नव्हताच.

1 जूनचीच निवड का?

मात्र खरी गंमत पुढे आहे. अशा जन्मतारखेची असूच नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची. त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक पालक मास्तरांना 'काय सोयीचं पडेल?' असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही 1 जून तारीख लिहू असं सल्ला देत वाढदिवस 1 जून अशी नोंद करुन घ्यायचे. आता 1 जूनच का तर यामागील कारण म्हणजे ही तारखी जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं असं दर्शवणारी आहे. भारतात शालेय वर्ष जून महिन्यात सुरु होतं. त्यामुळे 1 जून किंवा पुढील तारीख असेल तर त्यावेळी कमी वय असलेल्या मुलांनाही थेट पुढील वर्गात दाखला देणं सोपं व्हायचं. त्यामुळेच अनेकांच्या शालेय दाखल्यावर हीच तारीख वाढदिवस म्हणून दाखवली गेली. नंतर जन्माच्या दाखल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने अनेकांनी जन्माचा पुरावा म्हणून पुढे हाच 1 जूनची नोंद असणारा दाखला वापरण्यास सुरुवात अन् या 1 जूनच्या सार्वजनिक वाढदिवसाला सुरुवात झाली. याच अनुषंगाने मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही कायमची म्हणजेच 'ऑन पेपर' तरी 1 जूनच असते हे लक्षात येते.

जन्माचा दाखला अनिवार्य झाला अन्...

बरं एक जून 1 ही ऑन पेपर जन्मतारीख होण्याचं प्रमाण हे ग्रामीण भागातून अधिक वाढण्याचा काळ साधारणपणे सन 1985 पासून पुढचा, असं म्हणता येईल. कारण याच वर्षापासून सरकारी नियमानुसार जन्माचा दाखला बनवून घेणं आणि तो बनवला नसेल तर शाळेत दाखल करताना तो बनवणं अनिवार्य करण्यात आलं. त्यामुळेच अनेकांच्या जन्मदाखल्यावर सोयिस्कर पद्धतीने तारीख लिहिली जायची. आणि मग एकदा का जन्माच्या दाखल्यावर ही तारीख आली की तोच कायमचा बर्थ डे होऊन जायचा. अनेकांचा वाढदिवस या तारखेला असतो म्हणून या दिवसाला वाढदिवसांचा दिवस असंही म्हणतात.

रिटायरमेंट डे कनेक्शन

1 जून या तारखेची आणखीन एक भन्नाट कनेक्शन म्हणजे या दिवसाला 'सरकारी वाढदिवस'ही म्हणतात. सरकारी नियमांप्रमाणे निवृत्तीला आलेली व्यक्ती वयोमर्यादेनुसार 1 जून रोजी निवृत्त होण्याचं प्रमाणही या तारखेच्या वर नमुद महत्त्वामुळे अधिक आहे. म्हणजेच 1 जूनला वयाची 60 वर्ष पूर्ण करणारे अनेक सरकारी कर्मचारी 31 मे रोजी निवृत्त होतात.