तिवरे गावावर निसर्गाचा पुन्हा प्रकोप, वादळी वाऱ्याने घरांचे छप्पर उडाले

वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले

Updated: Apr 20, 2020, 10:21 AM IST
तिवरे गावावर निसर्गाचा पुन्हा प्रकोप, वादळी वाऱ्याने घरांचे छप्पर उडाले title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या धरण फुटी नंतर रविवारी पुन्हा एकदा तिवरे गावावर निसर्ग कोपलेलाच असल्याचे दिसून आले आहे. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले.

विजेचे खांब, झाडे कोसळल्याने गावात पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. गेल्यावर्षी तिवरे गावात अतिवृष्टीमुळे धरण फुटून मोठी जिवीत आणि वित्तहाणीतून गाव सावरत असतानाच रविवारी सायंकाळी वादळी पावसाने पुन्हा एकदा गावात हाहाकार माजवला. 

अचानक आलेल्या वादळाने घरांचे पत्रे उडाले. काहींचे छप्परच उडून गेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. झाडेही ठिकठिकाणी कोसळून मार्ग बंद झाले आहेत. 

तालुक्याच्या एका टोकाला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने चिपळुणात लगेच याची माहिती पोहचली नाही. शिवसेनेचे मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. 

मात्र सायंकाळ झाल्याने आणि अंतर ही दूरचे असल्याने नुकसानीचे पंचनामे त्या दिवशी झाले नाहीत.