रत्नागिरी: नाणारमधल्या जमिनी खरेदीवरून पुन्हा आरोपांची राळ उठली आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी हजारो एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला. गृहखात्याची धमकी देणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ठाकरेंवर कारवाई करून दाखवावी असे, आव्हान जठारांनी दिले आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे उत्तर देणारे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या आग्रहामुळे नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त नाणार रिफायनरीची जाहिरात छापून आल्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलली का, अशा चर्चेला सुरुवात झाली होती. यानंतर काही स्थानिक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून नाणार प्रकल्पाचे समर्थनही केले होते.
मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणारचा विषय आमच्यासाठी कायमचा संपल्याचे सांगून हा प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सभा घेऊन नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
मात्र, यानंतरही नाणार प्रकल्पाची चर्चा थांबलेली नाही. काही नाणार रिफायनरी समर्थकांनी तर हा प्रकल्प होण्यासाठी सत्यनारायणाला साकडे घातले होते. ज्या ठिकाणी शिवसेनेने सभा घेतली त्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. यावेळी गाऱ्हाणे घालण्यात आले.
दरम्यान, नुकतीच नाणारमध्ये एक सभा पार पडली. या सभेला जवळपास दोन हजार नाणार समर्थक जमल्याचे सांगितले जाते. पण सभेच्या ठिकाणी आलेल्या निम्म्याहून अधिक लोकांना आपण नेमके कशासाठी आलोय, ही सभा नेमकी कसली आहे, याचीच कल्पना नव्हती. या सभेत नेपाळहून आलेले गुरखेही होते. त्यामुळे या सगळ्यामागे कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.