प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : जिवंतपणी श्राद्ध घालणं हा शब्द प्रयोग तुम्ही नक्की ऐकला असेल. कोकणातील दोन तरूणांनी हा शब्द प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. मुंबईतल्या दोन तरूणांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पराक्रम केलाय.
जिवंतपणीच काकीला तरूणांनी स्वर्गात पाठवल्याचा प्रकार कोकणात समोर आलाय. कोरोनामुळेच मुंबईतल्या दोन तरूणांनी काकी वारल्याची बतावणी करत रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला...पण, त्यानंतर समोर आलेला प्रकार हा डोक्याला हात लावायला लावणारा अशाच होता.
लॉकडाऊननंतर जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातून गावांकडे येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली. त्यासाठी अनेक प्रकारची शक्कल देखील लढवली जात आहे.
दरम्यान, मुंबईतील दोन तरूणांनी चक्क काकी वारली आहे अशी बतावणी करत रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण, व्हिडीओ कॉल केल्यानंतर समोर आलेली घटना ही चक्रावून सोडणारी अशीच होती. भरणी नाक्यावर खेड पोलिसांनी या तरुणांना पकडले आणि प्रवासाबद्दल विचारले. त्यावेळी काकी वारल्याचे त्या तरुणांनी सांगितले. पण गेल्या १५ दिवसांत प्रवाशांचा अनुभव कोळून प्यायलेल्या पोलिसांनी त्या तरुणांची फेरतपासणी केली. तरुणांनी गावच्या घरी व्हिडीओ कॉल लावून पोलिसांसमोर दिला. त्यावेळी खुर्चीवर पांढऱ्या रंगाच्या साडीत मृतदेह असल्याचे त्यांनी पोलिसांना भासवले. पण पोलीसांनी यावर विश्वास न ठेवता गावच्या सरपंचाला फोन केला. तुमच्या गावात कोणी मयत झाले का ? अशी विचारणा केली. त्यावेळी या सर्वामागची सत्यता समोर आली. आणि त्या तरुणांचा भांडाफोड झाला.
लॉकडाऊननंतर मुंबई, पुणे सारख्या शहातून आता अनेक जण गावाकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. कोकणात रेल्वे ट्रकवरून, प्रेसचा बोर्ड वापरत किंवा अगदी पोलिसांची नजर चुकवत जंगलाचा आसरा घेत गावी दाखल झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मुंबईकर तरूणांनी गावी येण्यासाठी वापरलेली शक्कल सर्वांना चक्रावून सोडणारी अशीच आहे. सध्या कोरोनासोबत या तरूणांच्या डोक्यालिटीची देखील चर्चा सुरू आहे.