हाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित

हाथरस प्रकरणात योगी सरकारची मोठी कारवाई 

Updated: Oct 2, 2020, 09:08 PM IST
हाथरस प्रकरणात योगी सरकारची कारवाई, एसपी, डीएसपी, इन्सपेक्टर निलंबित title=

लखनऊ : हाथरस प्रकरणात योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. एसपी, डीएसपी आणि हाथरसचे निरीक्षक यांच्यावर कारवाई झाली आहे. या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची नार्को पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे विद्यमान एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि इतर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस कर्मचारी, फिर्यादी, पोलीस ठाण्याचे प्रतिवादी या सर्वांची पॉलिग्राफी चाचणी केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशातील योगी सरकार हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात आता कारवाई करताना दिसत आहे. सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही डीएम प्रवीण कुमार यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर धमकी आणि दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी एक व्हिडिओ समोर आला असून त्यात हाथरसचे डीएम पीडितेच्या कुटुंबाला धमकावताना दिसत आहेत. हाथरसचे डीएम म्हणत आहेत की मीडियाचे लोक निघून जातील, पण प्रशासनाला येथेच रहावे लागेल. त्यांना धमकावले जात असल्याचे हाथरसच्या पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. हातरस प्रशासनाकडूनही पीडितेच्या अंत्यसंस्कारांबाबत विचारपूस केली जात आहे. रात्री पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हाथरस प्रशासन या निर्णयामुळे अडचणीत आला आहे.

14 सप्टेंबर रोजी हाथरस येथे राहणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेची जीभ कापली आणि तिचा पाठीचा कणा देखील तोडला असा आरोप आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आले. मंगळवारी सकाळी पीडितेचा सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

हाथरसचे डीएम आणि एसपी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा केले जाईल असे म्हटले आहे.