कर्नाटक : आज सकाळी भाजपचे बी एस येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पहाटे पाचच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं आता सकाळी नऊ वाजता बंगळूरतल्या राजभवनात कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला येडियुरप्पांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्याआधी कर्नाटकाच्या शपथविधीवरुन मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि भाजपच्या वकीलांमध्ये युक्तीवादाचा जोरादार फड रंगला. सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिलेला असला, तरी राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाविषयी काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही. निमंत्रण देण्याआधी राज्यपालांना दिलेली सत्तास्थापनेचा दावा करणारी दोन पत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं येडियुरप्पा आणि भाजपच्या वकीलांना दिले आहेत. या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
रात्री उशिरा कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणाला आक्षेप घेणारी याचिका काँग्रेसनं दाखल केली. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि रात्री पावणेदोन वाजल्यापासून युक्तीवाद आणि प्रतिवादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर तीन न्यायाधिशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. या पीठात न्यायमूर्ती ए.के.सिकरी , न्यायामूर्ती अशोक भूषण आणि न्यायामूर्ती शरद बोबडे यांचा समावेश होता.