बंगळुरु : बी एस येडियुरप्पा आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. अगदी शपथविधीच्या शेवटच्या क्षणापर्यत रंगत गेलेला राजकारणाचा थरार हा येडियुरप्पांसाठी काही पहिलाच अनुभव नाही. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे येडियुरप्पा यांच्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपर्यंतचा प्रवास तेवढाच रोमांचकारी आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचा कौल अखेर भाजपलाच दिलाय. येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, ते बहुमत सिद्ध करणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
आज सकाळी भाजपचे बी एस येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पहाटे पाचच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं आता सकाळी नऊ वाजता बंगळूरतल्या राजभवनात कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला येडियुरप्पांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्यासाठी येडियुरप्पांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झालीय. त्याआधी कर्नाटकाच्या शपथविधीवरुन मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि भाजपच्या वकीलांमध्ये युक्तीवादाचा जोरादार फड रंगला. सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिलेला असला, तरी राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाविषयी काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही.
निमंत्रण देण्याआधी राज्यपालांना दिलेली सत्तास्थापनेचा दावा करणारी दोन पत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं येडियुरप्पा आणि भाजपच्या वकीलांना दिले आहेत. या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.रात्री उशिरा कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रणाला आक्षेप घेणारी याचिका काँग्रेसनं दाखल केली. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि रात्री पावणेदोन वाजल्यापासून युक्तीवाद आणि प्रतिवादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर तीन न्यायाधिशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. या पीठात न्यायमूर्ती ए.के.सिकरी , न्यायामूर्ती अशोक भूषण आणि न्यायामूर्ती शरद बोबडे यांचा समावेश होता.