जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली पाहिलीये का? किंमत इतकी की तोंडचं पाणी पळून जाईल

Worlds Most Expensive Bottle: पाण्याची बाटली विकत घ्यायची म्हटली तर आपण 100 ते जास्तीत जास्त 1000 रुपये खर्च करतो. पण जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली तुम्ही कधी पाहिली आहे का? या बाटलीची किंमत इतकी आहे की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे.   

शिवराज यादव | Updated: May 4, 2023, 07:06 PM IST
जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली पाहिलीये का? किंमत इतकी की तोंडचं पाणी पळून जाईल title=

Worlds Most Expensive Bottle: पाण्याची बाटली ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्वाची गोष्ट झाली आहे. सध्याच्या उकाड्यात तर प्रत्येकजण बॅगेच पाण्याची बाटली ठेवत असतो. पण ही बाटली विकत घेताना तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे खर्च कराल? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर याचं उत्तर 100 ते जास्तीत जास्त 1000 असेल ना. त्यापेक्षा एक रुपयाही दुकानदाराने जास्त घेतला तर आपण त्याच्यासोबत वाद घालतो. पण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या पाण्याच्या बाटलीची किंमत किती आहे हे माहिती आहे का?...ही किमत इतकी आहे की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. 

बाजारात सर्व प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या उपलब्ध आहेत. यामध्ये प्लास्टिकपासून ते काच आणि तांब्याच्या अशा सर्व बाटल्या आहेत. या बाटल्यांची किंमत 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत असते. जितकी चांगली बाटली घ्याल तितकी त्याची जास्त किंमत मोजावी लागते. पण या बाटलीची सर्वाधिक किंमत काय असेल म्हणजेच जगातील सर्व महागडी बाटली किंती रुपयांना मिळेल याचा अंदाज तुम्हाला आहे का? याचं उत्तर तुमच्या अपेक्षांच्या पलीकडचं आहे. कारण ही किंमत हजार नाही तर लाखांत आहे. विशेष म्हणजे या बाटलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्येही आहे. आता यात नेमकं असं काय खास आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मग जाणून घ्या..

एक्‍वा डि क्रिस्‍टैलो ट्रिब्‍यूटो ए मॉडिग्‍लीयानो (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) नावाची ही बाटली गेल्या 13 वर्षांपासून जगातील सर्वात महागडी आणि फॅशनेबल बाटली म्हणून ओळखली जाते. 2010 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. 

बाटली एवढी महाग असण्याचं कारण काय?

या बाटलीची किंमत तब्बल 50 लाख रुपये आहे. या बाटलीत फक्त 750 ML पाणी ठेवलं जाऊ शकतं. पण पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे ही बाटली इतकी महाग आहे. ही बाटली 24 कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. यामध्ये भरण्यात आलेल्या पाण्यातही 5 ग्रॅम 24 कॅरेट सोनं आहे. इतकंच नाही तर यामध्ये भरलेलं पाणी पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पाणी आहे. आइसलँड, फिजी आणि फ्रान्सच ग्लेशिअरमधून हे पाणी आणण्यात आलं आहे. 

आपल्या क्लासिक डिझानमुळे जगभरात प्रसिद्ध असणारे कलाकार फरनांडो अल्टमिरानो यांनी या बाटलीचं डिझाइन तयार केलं आहे. आपल्या वेगळ्या डिझाइनमुळे 2010 मध्ये झालेल्या लिलावात या बाटलीसाठी 60 हजार डॉलर्स म्हणजेच 48 लाख 60 हजारांची बोली लावण्यात आली होती. आपल्या विशिष्ट डिझाइनमुळे या बाटलीला पुरस्कारही देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, ट्रिब्‍यूटो मोडिग्लियाची जगभरात एकच बाटली आहे. या बाटलीत सोन्याव्यतिरिक्त प्लॅटिनम आणि डायमंडचा वापर करण्यात आला आहे. ही बाटली तयार करणारी संस्था अल्टमिरानोने समाजकार्यासाठी 5 लाख युरो दान केले आहेत. या बाटलीचं डिझाइन शिल्पाप्रमाणे आहे, जी पाहताना फार आकर्षक जाणवते.