'...तर भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये पाठवू'

राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Updated: Oct 14, 2019, 11:56 AM IST
'...तर भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये पाठवू' title=

सोनपत : दहशतवादाशी लढण्याची पाकिस्तानची तयारी असेल, तर भारतीय सैन्य आम्ही पाकिस्तानात पाठवू, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. तसंच पाकिस्तानला दहशतवाद संपवायचा नसेल तर मात्र तो नष्ट करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला आहे. हरियाणाच्या सोनपतमध्ये झालेल्या जाहीर सभेत राजनाथ सिंह बोलत होते.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाला विरोध करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाकडे मदत मागितली, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानच्या लोकांना काश्मीरबाबत उचकवण्याबाबतही राजनाथ सिंह यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला.

दहशतवाद पोसत बसलात तर पाकिस्तानचे आणखी तुकडे होतील, असं भाकीत राजनाथ सिंग यांनी वर्तवलं आले. मैत्री आणि सहाकार्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे यायला तयार आहोत, असंही राजनाथ सिंह म्हणाले.