शहीद पतीप्रमाणेच वीरपत्नी वायुदलाच्या वाटेवर

धाडसी वृत्तीची अनेकांकडून प्रशंसा 

Updated: Jul 16, 2019, 08:59 AM IST
शहीद पतीप्रमाणेच वीरपत्नी वायुदलाच्या वाटेवर  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल यांती पत्नी गरिमा अबरोल या लवकरच भारतीय वायुदलात रुजू होण्याच्या मार्गावर आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वाराणासी येथे झालेल्या एसएसबी मुलाखतीत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. येत्या काळात त्या तेलंगणा येथील डुंडीगलमधील भारतीय वायुदलाच्या अकादमीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी २०१९ला बंगळुरू येथे मिराज २००० च्या अपघातात स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल शहीद झाले होते. पती समीर अबरोल यांच्या निधनानंतरच गरिमा यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाखातर आता मुलाखतीच्या फेरीत उत्तीर्ण होत पुढील प्रवासासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये त्या 'एअरफोर्स अकादमी'त प्रवेश करु शकतील असं म्हटलं जात आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी गरिमा सोशल मीडियावर प्रकाशझोतात आल्या होत्या. शहीद स्क्वाड्र लीडर समीर अबरोल यांच्यासाठी गरिमा यांनी एक कविता लिहिली होती. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी भावनांचा वाट मोकळी करुन दिली होती. 
सोशल मीडियाच्या माध्यमातून गरिमा यांनी आणखीही पोस्ट लिहित त्यांच्या मनात होणारा कोंडमारा सर्वांसमोर आणला होता. अनेकांनीच त्यांच्या या पोस्ट शेअर करत त्यांच्याप्रती पाठिंबा व्यक्त केला होता. तर, काहींनी गरिमा यांच्या धीट वृत्तीची दाद दिली होती. सध्याच्या घडीलासुद्धा सुरक्षा दलाच्या सेवेत रुजू होण्याचा त्यांचा निर्णय आणि त्या वाटेवर सुरु असणारा त्यांचा प्रवास पाहता अनेकांसाठीच त्या एक प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.