नवी दिल्ली: राफेल विमानांची चढ्या दरात खरेदी करून मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. ते शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल विमानांच्या खरेदीबाबत नव्याने काही प्रश्न उपस्थित केले. भारतीय वायूदलाला ७ स्क्वॉड्रनसाठी १२६ विमानांची तातडीने गरज आहे. मग मोदी सरकारने फ्रान्सकडून केवळ ३६ विमानेच खरेदी का केली. या प्रत्येक विमानाची किंमत ४१.४२ टक्क्यांनी जास्त होती. सरकारने हा निर्णय घेऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
नेमका काय होता 'राफेल' करार... जाणून घेऊयात
तसेच या सरकारकडून कोणत्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवणे व्यर्थ असल्याचेही त्यांनी म्हटले. आता निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उर्वरित ६० दिवसांमध्येही देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार फार काही करु शकणार नाही. भारतीय अर्थव्यवस्था सध्या संकटात असून ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
P. Chidambaram, Congress: We don't expect anything good from this govt, this is a countdown to the election, nothing that the govt will do in the next 60 days can change the state of the economy. The state of the economy is perilous, every indicator is worrisome. pic.twitter.com/QHfub6nTRt
— ANI (@ANI) January 18, 2019
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राफेलच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारची चांगलीच कोंडी केली होती. संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी राफेल करारातील तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राफेल कराराचे सर्व तपशील जाहीर करण्याच्या मागणीवरून काँग्रेस शेवटपर्यंत मागे हटली नव्हती.