Weather : तापमानात घट झाल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता, पावसाचा अंदाज

Weather News: गेल्या दोन दिवसात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्ली आणि यूपीसह संपूर्ण उत्तर भारतात 13 डिसेंबरनंतर थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.

Updated: Dec 13, 2022, 08:59 AM IST
Weather : तापमानात घट झाल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता, पावसाचा अंदाज title=

Weather News Latest Updates: गेल्या दोन दिवसात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात तापमानात घट झाल्याने थंडीचा प्रभाव दिसायला लागला आहे, मात्र असे असतानाही देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी जाणवत नाही. डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेला तरी तापमानाचा पारा सामान्यापेक्षा जास्त असताना दिवसाचे तापमान का वाढले आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्ली आणि यूपीसह संपूर्ण उत्तर भारतात 13 डिसेंबरनंतर थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर तापमानात घट नोंदवली जाऊ शकते, असे म्हटलेय.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज 

येत्या 48 तासांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे ऐन हिवाळ्यात उकाडा, इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात दोन दिवसांपासून थंडी जाणवत असली तरी दुपारी उकाडा होताना दिसत आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात 24 तासात तापमानाचा पारा 7.5°c ने वाढला आहे. तापमान अचानक 11°c वरून 18.5°c पर्यत वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. वातावरणात होणाऱ्या झपाट्याच्या बदलांमुळे जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे रबी पीकही धोक्यात आले आहे.

एन्फ्लूएन्झा या विषाणूचा प्रभाव वाढलाय

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे प्रथमच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कमालीचा उकाडा जाणवत आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे हिवाळ्यात उकाडा जाणवतोय. अशा विचित्र वातावरणात एन्फ्लूएन्झा या विषाणूचा प्रभाव वाढलाय. अजून तीन दिवस वातावरण असंच ढगाळ राहील असा अंदाज आहे. मंदौस चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहात आहेत. त्यातच आता अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. दिवसा कडक उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे एन्फ्लुएन्झा आणि पॅरा एन्फ्लूएन्झा या विषाणूंचा प्रादूर्भाव वाढून नागरिक आजारी पडत आहेत. श्वसनाचे आजार वाढलेत. 

15 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज

चेन्नई आणि तमिळनाडूच्या इतर अनेक भागांमध्ये पावसाबाबत, भारतीय हवामान विभागाने (IMD)अलर्ट जारी केला आहे. 13 डिसेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने चेन्नई आणि तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये 15 डिसेंबरपर्यंत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर, कांचीपुरम जिल्ह्यातील शाळांना तसेच तिरुवल्लूर आणि उथुकोट्टई तालुक्यांसह काही भागात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने सांगितले की, तामिळनाडू आणि केरळमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दिल्लीत तापमान 8 अंशांवर  

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी कमाल तापमान 27.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे हंगामाच्या सरासरीपेक्षा चार अंशांनी जास्त आहे. त्याचवेळी, दिल्लीचे किमान तापमान 8.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीत धुक्यासह आकाश स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशातील काही भागात रिमझिम पाऊस  

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे वास्तव मध्य प्रदेशातही पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्याच्या काही भागात रिमझिम आणि ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने (IMD) म्हटेल आहे की, भोपाळच्या अरेरा हिल्समध्ये 2.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर छिंदवाड्याच्या तामिया भागात सहा मिमी पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहडोल, सागर, होशंगाबाद, भोपाळ, इंदूर, उज्जैन आणि जबलपूर विभागात किमान तापमानात तीन ते चार अंशांनी वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मध्य प्रदेशातील होशंगाबाद विभागात काही ठिकाणी हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो.

राजस्थानमध्ये थंडीचा प्रभाव दिसू लागला असून चुरूमध्ये तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू लागले आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सीकरच्या फतेहपूरमध्ये किमान तापमान 6.0 अंश, करौलीमध्ये 7.3 अंश, चित्तोडगडमध्ये 7.4 अंश, पिलानी (झुंझुनूमध्ये 7.7 अंश), संगरिया (हनुमानगड) येथे 8.9 अंश आणि बनआलीमध्ये 10 अंश होते. टोंक) आणि सीकरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या २४ तासांत हवामानाचा पॅटर्न असाच राहण्याची शक्यता आहे.