Weather News : ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलंच वाढलं होतं. ही तापमानवाढ अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम करून गेली. राज्यातील किनारपट्टीलगतच्या भागांमध्येही हवेत आद्रता जास्त असल्यामुळं उकाडा अधिकच जाणवला. ज्यानंतर रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी तापमानाच काही अंशांची घट नोंदवली जाताच राज्यात हिवाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागानंही म्हटलं.
ऑक्टोबरच्या अखेरीपासून उकाडा कमी होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होईल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण, आता मात्र नोव्हेंबरमध्ये थंडीचच प्रमाण अंशत: कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतरही काही राज्यांमध्ये आणि विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये किमान तापमान सरासरीहून जास्त असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्था Skymet च्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये (Uttarakhand, Himachal Pradesh, Jammu Kashmir) उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हलक्या बर्फवृष्टीची शक्यता आहे. ज्यामुळं मैदानी क्षेत्रांमध्ये तामानात घट होऊ शकते. तर, पर्वतीय भागांमध्ये बर्फाची चादर पाहायला मिळू शकते.
सध्या अफगाणिस्तान आणि नजीकच्या भागांमध्ये एक कमकुवत पश्चिमी झंझावात सक्रीय आहे. तर, दक्षिण पूर्व राजस्थानवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांसाठीचा अंदाज वर्तवायचा झाल्यास कर्नाटकच्या दक्षिण भागापासून तामिळनाडू, केरळ, अंदमान- निकोबार, लक्षद्वीपमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात. तर, आंध्र प्रदेशासह गोव्याच्या किनारपट्टी भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. ज्याचे परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांपर्यंत दिसून येणार असून, काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील आणि राज्यातील एकंदर हवामानाची स्थिती पाहता सध्या अनेकांनीच हिवाळी सहलींचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. आठवडी सुट्ट्या आणि सणावारांचे दिवस अशी एकंदर आखणी करत सुट्ट्यांसाठी शहरी धकाधकीपासून दूर जाणाऱ्यांचा मोठा आकडा दिसत आहे. यामध्ये अनेकांनीच हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या राज्यांना पसंतीही दिली आहे. पण, इथं जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज विचारात घेणं मात्र विसरू नका, पूर्ण तयारीनिशी सहलीला जा असं आवाहन सदर पर्यटन स्थळांवरील स्थानिक प्रशासन करताना दिसत आहे.