नवी दिल्ली: आम्हाला शरद पवारांमुळे लढण्याची प्रेरणा मिळाली, असे वक्तव्य झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हेमंत सोरेन यांचे अभिनंदन केले होते. शरद पवारांच्या या ट्विटला आज हेमंत सोरेन यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, शरद पवारजी खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील तुमच्या लढाईमुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळाली, असे सोरेन यांनी म्हटले.
तत्पूर्वी शरद पवार यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत झारखंडमुळे देशातील भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे, असे वक्तव्य केले होते. भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वापर करून झारखंड हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासीबहुल लोकसंख्या असणाऱ्या झारखंडने तसे होऊन दिले नाही. यासाठी मी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो. देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडचा कित्ता गिरवेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
Thank you so much @PawarSpeaks ji. Your battle in Maharashtra has been inspiring for all of us. https://t.co/FMLfsgh9GJ
— Hemant Soren (@HemantSorenJMM) December 24, 2019
'वन मॅन शो' आणि 'टू मॅन आर्मी'चा खेळ खल्लास; शत्रुघ्न सिन्हांचा मोदी-शहांना टोला
हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. आघाडीचे प्रमुख म्हणून हेमंत सोरेन हे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेच दावा करतील. तसेच, अनेक औपचारिकतांनंतर सोरेन सरकार स्थापन होईल.
हीच परिस्थिती राहिली तर देशातील जनता झारखंडचा कित्ता गिरवेल- पवार