विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशातील तळीरामांची संख्या वाढत चालल्याचा निष्कर्ष सामाजिक न्याय मंत्रालयाचा एका सर्वेक्षणाच्या आधारे काढला आहे. तळीरामांची संख्या का वाढली याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. बर्थडे पार्टी असो... नाही तर लग्नाची हळद... पिकनिक असो, नाही तर ऑफिस सेलिब्रेशन... चार मित्र एकत्र आले की प्याल्याला प्याला भिडणार आणि चिअर्स असा मोठा गजर होणार, हे ठरलेलं. कारण दारु पिणं हे आता व्यसन नाही, तर स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. औचित्य काहीही असलं तरी ओली पार्टी तो बनती ही है. मात्र यामुळंच की काय, देशात तळीरामांची संख्या वाढली आहे.
भारतातील एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के नागरिक दारू पिऊन टल्ली होतात असा निष्कर्ष सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून पुढं आला आहे. याचाच अर्थ देशातील १६ कोटी लोक दारू पितात असं हा अहवाल सांगतो. यापैकी सर्वाधिक लोक देशी दारू पितात. एवढंच नव्हे तर प्रत्येक चौथा तळीराम दारू पिऊन मारामारी करतो, असा धक्कादायक निष्कर्षही अहवालात आहे.
दारू प्याल्यानंतर लोक मारामारी का करतात, याची कारणं डॉक्टर सांगत आहेत. या अहवालात आणखी काही निष्कर्ष पुढं आले आहेत.
१. दारू पिणाऱ्यांमध्ये पाणी न टाकता देशी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
२. ४ टक्के लोक वाईनला पसंती देतात तर २१ टक्के लोक बिअर पितात.
३. दारू पिणाऱ्यांमध्ये ९५ टक्के पुरुष, तर ५ टक्के स्त्रिया आहेत.
४. त्रिपुरामध्ये एकूण लोकसंख्येच्या ६३ टक्के लोक दारू पितात. छत्तीसगडमध्ये ५७ टक्के, पंजाबमध्ये ५२ टक्के लोक दारू पितात.
५. महाराष्ट्र, गोवा, अरूणाचल प्रदेश अशा ७ राज्यात सुमारे २० टक्के लोक दारू पितात असं समोर आलं आहे.
कोणतंही व्यसन वाईटच... मग तो चहाचा प्याला असो, नाहीतर मद्याचा... त्यात दारू पिऊन भांडणं होणार असतील तर कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतात, ते वेगळं. त्यामुळं थर्टी फर्स्टला एकच प्याला ओठाला लावणार असाल तर आधी हे निष्कर्ष नक्की आठवा.