कानपूर: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जग ठप्प झाले आहे. यामुळे आगामी काळात मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. मात्र,जगरहाटीचा वेग मंदावल्याने सध्या निसर्गात मात्र सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारला स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून जी गोष्ट जमली नाही ती कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे साध्य झाली आहे.
या लॉकडाऊनमुळे गंगा नदीतील प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कानपूर पट्ट्यातून वाहणारी गंगा नदी ४० ते ५० टक्के शुद्ध झाली आहे. कानपूरमधून गंगा नदी तब्बल २०७१ किलोमीटरचा प्रवास करते. याच टप्प्यात गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे सांगितले जाते.
Corona : शेपटीवाल्या प्राण्यांची मुंबईत भरली सभा.....
मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या हे चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसत आहे. लॉकडाऊमुळे कानपूरमधील कारखाने ठप्प झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यांमधून नदीत प्रदूषित पाणी येणे थांबले आहे. त्यामुळे गंगेचे पाणी ४० ते ५० टक्के शुद्ध झाले आहे, अशी माहिती बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. पी.के. मिश्रा यांनी दिली.
२०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर नमामी गंगे ही मोहीम सुरु करण्यात आली होती. पहिल्या वर्षात या मोहीमेचा खर्च केवळ १७०.९९ कोटी इतका होता. मात्र, पाच वर्षानंतर हा आकडा तब्बल २६२६.५४ वर जाऊन पोहोचला होता.
#WATCH Water quality of River Ganga in Kanpur improves as industries are shut due to #Coronaviruslockdown. As per Dr PK Mishra, Professor at Chemical Engineering&Technology, IIT-BHU,Varanasi, there has been 40-50% improvement in quality of water in Ganga pic.twitter.com/9uYInk01ji
— ANI UP (@ANINewsUP) April 5, 2020
या मोहीमेतंर्गत गंगा आणि तिच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवनासाठी मोठ्याप्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय, या नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पांवरही बराच खर्च केला जातो. मात्र, आता लॉकडाऊनमुळे नदीत येणारे सांडपाणी पूर्णपणे बंद झाल्याने गंगा नदी आपोआप शुद्ध होत आहे.