मुंबई : 'दुल्हे की सालियों... ओ हरी दुपट्टेवालियो...' हे गाणं आठवतंय का तुम्हाला? लग्नसोहळ्यांमध्ये नवरदेवाच्या मेहुण्यांशी असणाऱ्या नात्याचं सुरेख चित्रण या गाण्यात करण्यात आलं आहे. याच नात्याची आणि या गाण्याची प्रत्यक्षातील प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून येत आहे.
लग्नातील सर्वात खास समारंभांपैकी एक म्हणजे 'जुता चुपाई', अर्थात नवरदेवाचे बूट लपवणं. जिथे मेहुणी वराचे बूट लपवते आणि ते परत मिळवण्यासाठी, मेहुणीची जी मागणी असेल ती नवरदेवाला पूर्ण करावी लागते. ती जितके पैसे मागेल तितके त्याला द्यावे लागतात बरं. प्रत्येक भारतीय लग्नात हा विधी वातावरण मजेदार आणि अधिक उत्साही करुन जातो.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात मेहुणी नवरदेवाचे बूट काढण्यासाठी थेट त्याच्या मांडीवर जाऊन बसते. तिथे इतरांचीही गर्दी दिसते, जेणेकरुन बूट नेमके कोणी लंपास केले याची त्याला कुणकुणही लागू नये. नवरीचे भाऊसुद्धा तिथं बूट काढून घेण्यासाठी हजर असल्याचं दिसत आहे. बरं पायातले बूट जाऊ नयेत यासाठी नवरदेवानं बरेच प्रयत्न करुनही त्याच्या वाट्याला निराशाच आल्याचं पाहायला मिळत आहे.
brides_special या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. लग्नसमारंभात असे अनेक प्रसंग घडतात जे कायमस्वरूपी लक्षात राहतात, तुम्ही असा कोणता प्रसंग अनुभवला आहे का?