विशाखापट्टणमध्ये कंपनीत मोठी वायूगळती; सहा जणांचा मृत्यू

आज पहाटे ही कंपनी पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते

Updated: May 7, 2020, 11:00 AM IST
विशाखापट्टणमध्ये कंपनीत मोठी वायूगळती; सहा जणांचा मृत्यू title=

विशापट्टणम: विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टण शहरालगत असणाऱ्या गोपालापट्टण परिसरात ही कंपनी आहे. सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आज पहाटे ही कंपनी पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानकपणे विषारी वायूच्या गळतीला सुरुवात झाली. यामुळे अनेक कामगार जागीच बेशुद्ध पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत साधारण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूमुळे तीन किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलावली आहे. वायू गळतीमुळे बेशुद्ध पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना श्वास घेण्यात मोठी अडचण जाणवत आहे. 

दरम्यान, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन वायू गळतीमुळे अत्यवस्थ असणाऱ्या लोकांची भेट घेतली आहे.ही वायू गळती नेमकी कशामुळे सुरु झाली, हे अद्याप समजलेले नाही. विषारी वायू तीन किलोमीटरच्या परिसरात पसरल्यामुळे हळूहळू रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्वांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्याचा त्रास जाणवत आहे. या लोकांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.