गुजरातमध्ये दोन सिंह आणि दोन कुत्रे आमने-सामने आले होते. हे चौघेही जवळपास एकमेकांना भिडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर अमरेली येथील सावरकुंडला येथील गोठ्यात हा सगळा प्रकार घडला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
व्हिडीओत दिसत आहे की, सिंह गेटच्या दिशेने चालत येतात. यावेळी गेटवर सुरक्षेसाठी तैनात असणारे कुत्रे त्यांच्यावर भुंकू लागतात. कुत्रे भुंकू लागल्याने सिंहदेखील त्याच्या अंगावर चालून जातो. पण मध्ये गेट असल्याने त्यांच्यात अडथळा येत असतो. यानंतर सिंह पुढे निघून जातात. पण कुत्रे भुंकत असल्याने संतापलेला सिंह पुन्हा गेटवर येऊन धडकतो. यावेळी गेटही काहीसा मागे जातो. यानंतर सिंह तेथून निघून जातात.
Dog Vs Lion...Only In Gujarat #lion #Gujaratpic.twitter.com/jGPh3EHVce
— My Vadodara (@MyVadodara) August 14, 2024
सिंह निघून गेल्यानंतर घरातून एक व्यक्ती बाहेर येऊन कुत्रे नेमकं का भुंकत होते हे पाहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला सिंह आले होते याची काहीच कल्पना नसते. ते गेट उघडून बॅटरीच्या सहाय्याने झाडीतही पाहण्याचा प्रयत्न करतो. पण सुदैवाने सिंह निघून गेल्याने त्याला काही दिसत नाही. अन्यथा सिहांनी त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राखीव वनक्षेत्रातून सिंह भटकले होते. मात्र, या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गुजरातमध्ये सिंहांच्या संवर्धन आणि संरक्षणाविषयी जागरुकता पसरवण्यासाठी कार्यक्रमांसह जागतिक सिंह दिन साजरा केल्यानंतर ही घटना समोर आली.
राज्य वन विभागाने नागरिकांना एसएमएस आणि ईमेलद्वारे जनजागृती करून हा दिवस साजरा केला आणि सिंहांची संख्या असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रॅली, चित्रकला स्पर्धा इत्यादींमध्ये भाग घेतला. 2020 च्या जनगणनेनुसार, गुजरातमध्ये 674 आशियाई सिंह आहेत.