15 Aug 1947 Newspapers Headings : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीयांसाठी एक नवी पहाट घेऊन आला. स्वातंत्र्याची भावना, देशातून परकियांची गच्छंती आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान या साऱ्याचं प्रतीक असणारा हा क्षण अतिशय महत्त्वाचा आणि अवर्णनीय असाच होता. तुमच्याआमच्या कुटुंबातील काही पिढ्यांनी प्रत्यक्षात तो काळ अनुभवला. आजच्या पिढीला हीच मंडळी त्या काळात नेमकं काय घडलेलं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला दिवस नेमका कसा होता, सर्वत्र वातावरण कसं होतं याची सुरेख वर्णनही केलं.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये नेमकं काय लिहिलेलं, पत्रकारांनी स्वातंत्र्याला नेमकं कसं शब्दबद्ध केलं होतं माहितीये? देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या बातमीला ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रानं पहिल्या पानावर मानाचं स्थान देत ‘Birth of India’s Freedom’ अशा मथळ्याचं वृत्त या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्याचा जन्म... असा या हेडिंगचा थेट अर्थ.
‘हिंदुस्तान’ या हिंदी भाषिक दैनिकानं ‘शताब्दियों की दासता के बाद भारत में स्वतंत्रता का मंगल प्रभात.’ असं लिहित स्वातंत्र्याचा क्षण शब्दबद्ध केला. ‘बापू (महात्मा गांधी) की चिर तपस्या सफल.’ असंही या वर्तमानपत्रात म्हटलं गेलं होतं. ‘द हिंदुस्तान टाइम्स’नं ‘India Independent: British Rule Ends’ अशा मथळ्याचं वृत्त प्रसिद्ध करत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं वृत्त घरोघरी पोहोचवलं.
फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही माध्यमांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यासंदर्भातील वृत्त प्राधान्यानं प्रसिद्ध केलं होतं. ‘Two Dominions Are Born’ असं लिहित ‘द स्टेट्समेन’नं हे वृत्त प्रसिद्ध केलं. तर, ‘India Achieves Sovereignty Amid Scenes of Wild Rejoicing’ असं लिहित 'द वॉशिंग्टन पोस्ट'नं हे वृत्त प्रसिद्ध केलं.
‘द न्यूयॉर्क टाइम्स’नं भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा नकाशा छापत ‘Two Indian Nations Emerge on World Scene’ अशा शब्दांत या महत्त्वाच्या प्रसंगाविषयीचं वृत्त दिलं होतं. जागतिक पटलावर दोन स्वतंत्र्य राष्ट्रांचा जन्म झाला असून, भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांचा जन्म झाला आहे, संघर्ष अद्यापही सुरूच असं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. ‘द कुरियर मेल’नं ‘British Rule in India Ends’ अशा शब्दांत भारतातील घटनांविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं.